आखाडा बाळापूर ( हिंगोली ): फ्यूचर इंडिया कंपनीचे गृहकर्ज मंजूर करून देतो असे सांगत आखाडा बाळापूर येथील शिक्षकाची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली आहे. आरोपीने तब्बल 25 लाख 76 हजार रुपयांचा गंडा शिक्षकाला घातला आहे. या प्रकरणी बाळापूर पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आखाडा बाळापूर येथील राजर्षी शाहूमहाराज विद्यालय येथे विजय केशवराव कदम हे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांना आरोपीने फ्युचर इंडिया कंपनीचे होम लोनचे आमिष दिले. व्हाट्सअपवर तुमचे कर्ज मंजूर झाले आहे, तुमचा चेक तयार झाला आहे, अधिक रक्कम मंजूर करून देतो, असे सांगत आरोपीने शिक्षकाकडून आरोपीने वेळोवेळी रक्कम उकळली. दिनांक 7 जानेवारी 2021 पासून ते 9-9-2021 पर्यंत वेळोवेळी गृह कर्जासाठी लागणारे प्रोसेसिंग फी व इतर बाबी सांगत शिक्षकाकडून तब्बल 25 लाख 76 हजार रुपये विविध बॅंक खात्यात मागवून घेतले.
मात्र, होमलोन मंजूर होत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच शिक्षक विजय केशवराव कदम यांनी आखाडा बाळापुर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार आरोपी कृष्णकांत सुरी ( रा. दीनदयाल उपाध्याय नगर ,लहरत जवळ, सिक्वल सुखलिया, इंदौर ,राज्य मध्यप्रदेश ) याच्या विरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम 420, 467,468,471 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार पी.सी.बोधनापोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बालाजी पुंड करीत आहेत.