- इस्माईल जाहगीरदारवसमत: तालुक्यातील वाळू घाटावर बेकायदा वाळू उपसा रात्रंदिवस सुरुच आहे. वेळोवळी सांगूनही वाळूमाफिया ऐकत नसल्याचे पाहून शुक्रवारच्या रात्री ११.३० वा दरम्यान स्वतः तहसीलदार शारदा दळवी कारवाईसाठी रस्त्यावर उतरले. एका टिप्परला तहसीलदारांनी थांबण्याचा इशारा केला होता. परंतु चालकाने नांदेड मार्गावर सुसाट वेगाने टिप्पर पळवला. तहसीलदारांनी पथकासह सिनेस्टाईल पाठलाग करत टिप्पर ताब्यात घेतले.
वसमत तालुक्यातील पूर्णा नदीवरील ७ वाळू घाटांवर बेकायदा वाळूउपसा सुरुच आहे. महसुल पथकाला गुंगारा देत तस्कर नदीतून गाढवांच्या साह्याने वाळू उपसा करत मोठ्या वाहनातून अवैध वाहतूक सुरु आहे. ३० जून रोजी रात्री ११.३० वाजता वसमत शहरात बेकायदा वाळू विक्रीस घेऊन येणाऱ्या टिप्पर चालकास तहसीलदार शारदा दळवी यांनी थांबण्याचा इशारा केला. चालकाने न थांबता टिप्पर वेगाने नांदेड मार्गावर पळवले. यामुळे तहसीलदार दळवी, मंडळ अधिकारी प्रियंका खडसे, तलाठी परम गरुड, आर.एन.कोल्हे यांच्या पथकाने जवळपास ७ ते १० किमी सिनेस्टाईल पाठलाग करत टिप्पर ताब्यात घेतले. टिप्पर, आतील तीन ब्रास वाळू महसूल पथकाने ताब्यात घेतले. यानंतर दंडात्मक कारवाईसाठी टिप्पर तहसील कार्यालय परिसरात लावले आहे.
वसमत तालुक्यातील अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी तहसीलदार दळवी यांनी लक्ष घातले आहे. महसुल पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही पथके रात्री गस्त घालत आहेत. तसेच स्वतः तहसीलदार अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी रस्त्यावर उतरल्या आहेत. तहसीलदारांच्या बेधडक कारवाईने वाळूमाफियांचे धाबे दणाणले आहे.