औंढा नागनाथ (हिंगोली ): तालुक्यातील सिद्धेश्वर धरणामध्ये येलदरी धरणातील पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यामुळे धरणातील पाण्यासाठ्यात वाढ झाल्याने सोमवारी रात्री 10 वाजाता दहा गेट उघडण्यात आले आहेत. त्यामुळे पूर्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. पाण्याच्या आवक वाढत गेली तर सळणा येथील पूल पाण्याखाली येऊन नांदेड-औरंगाबाद हा महामार्ग बंद होण्याची शक्यता आहे.
औंढा नागनाथ तालुक्यातील सिद्धेश्वर धरणाची दहा गेट उघडून 50,000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग पूर्णा नदी पात्रात करण्यात येत आहे. या दरवाजे दहा फुटाने वर घेत पाण्याचा विसर्ग होत आहे. यामुळे मातामाथा येथील पुलाच्या खालोखाल नदीपात्रातील पाणी वाहत आहे. पाण्याचा विसर्ग वाढत गेला तर येथून जाणारा महामार्ग बंद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जलसंपदा विभाग व पोलिस प्रशासनाच्या वतीने या रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनचालकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे.
त्याचप्रमाणे पूर्णा नदी पात्रा शेजारील परभणी व हिंगोली जिल्ह्यातील एकूण २७ गावांना देखील महसूल प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पूर्णा नदी पात्रातील पाणी पातळी वाढली असल्याने गावातील छोट्या ओढ्यांमधील पाणी या पात्रात येण्यास अटकाव होत आहे. यामुळे ओढ्यांचे पाणी आजुबाजुच्या शेतामध्ये जाऊन तुंबलेले आहे. या पाण्यामुळे शेतकऱ्यांच्या उभ्या पिकाची हानी झाली आहे.