ठाण्यापासून हाकेच्या अंतरावरील बाजारपेठेत दोन तास चोरट्यांचा खुलेआम धुडगूस
आखाडा बाळापूर : पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या आखाडा बाळापूर येथील मुख्य बाजारपेठेतील १० दुकाने चोरट्यांनी एकाच रात्री फोडून पोलिसांपुढे आव्हान उभे केले आहे. कापड दुकान, रेडिमेड दुकान, किराणा, भांड्याचे दुकान, हॉटेल व पानटपरी अशा सर्व प्रकारची दुकाने फोडली. दोन दुकानांतून ५७ हजार २०० रुपये रोकड व एका दुकानातील डीव्हीआर चोरून नेला आहे. पोलीस अधीक्षक कलासागर बाळापूरच्या ठाणे तपासणीसाठी येत असतानाच चोरट्यांनी अशी सलामी देऊन खळबळ उडविली आहे. विशेष म्हणजे, बाळापूर ठाणेहद्दीतील ही दुसरी घडली आहे.
आखाडा बाळापूर पोलीस ठाण्याच्या अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या मुख्य बाजारपेठेत चोरट्यांनी धुडगूस घातला. २० डिसेंबर रोजी रात्री एक ते तीन वाजेदरम्यान मुख्य बाजारपेठेतील तब्बल १० दुकानांचे कुलूप तोडले. काही दुकानांत प्रवेश करून रोकड लंपास केली. शैलेश सुभाष गोविंदवार यांच्या माऊली कापड दुकानाचे शटरचे कुलूप तोडून ३५ हजार रुपये रोख लंपास केले. सुनील संजय जाधव यांच्या साई किराणा दुकानाच्या गल्ल्यातील १५ हजार रुपये रोख चोरून नेले. सीसीटीव्हीचा सीडीआर मशीनही चोरट्यांनी पळविला असून वायर तोडले तसेच टीव्ही फोडला. शेख निसार शेख नसीर यांची पानटपरी तोडून १५०० रुपये रोख व सिगारेटचे पाकीट चोरले. ज्ञानबाराव नागोराव शिंदे यांच्या श्री संत तुकामाई रेडिमेड दुकानाचे कुलूप तोडून चोरीचा प्रयत्न केला. शंकर कानबाराव रणखांब यांच्या महात्मा बसवेश्वर किराणा दुकानाचे शटर वाकून चोरीचा प्रयत्न केला. रुपेश रमेशराव कंधारकर यांच्या महावीर स्टोअर या भांड्याच्या दुकानातही शटर वाकवून आत प्रवेश केला. रोख १५०० रुपये व काही चिल्लर चोरून नेली. शेख इब्राहिम शेख अहेमद यांच्या नॅशनल हॉटेलमध्ये १६०० रुपयांची चिल्लर व ५०० रुपये किमतीचे सामानाचे नुकसान केले. संजय दिगंबर जाधव यांच्या पंजाब किराणा दुकानाचेही कुलूप तोडले. परंतु, तिथे चोरांच्या हाती काहीच लागले नाही. इतरही दोन दुकानांचे कुलूप तोडण्यात आले असून तेथे चोरीचा प्रयत्न फसला. तब्बल दोन तास चोरट्यांनी या व्यापारपेठेत धुडगूस घातला.
गुरखा फिरत असताना त्याला चाेरट्यांची चाहूल लागली. चोरट्यांची संख्या जास्त असल्याने त्याने बाजूला जाऊन पोलिसांना याबाबत माहिती दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक रवी हुंडेकर, पोलीस उपनिरीक्षक अच्युत मुपडे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. यावेळी आठवडी बाजारमार्गे चोरट्यांनी पळ काढला. याप्रकरणी शैलेश सुभाष गोविंदवार यांच्या फिर्यादीवरून आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला .या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस जमादार संजय मार्के करीत आहेत.
बाळापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही दिवसांपूर्वीच वारंगा फाटा येथे एकाच रात्री ६ दुकाने फोडली होती. त्यानंतर बाळापुरात तब्बल १० दुकाने फोडून चोरट्यांनी पोलिसांना खुले आव्हान दिले आहे. बाळापूर पोलीस ठाण्याची वार्षिक तपासणी करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक बाळापूर दौऱ्यावर येणार आहेत. त्यांची तयारी करण्यासाठी बाळापूर पोलीस गुंतले असताना चोरट्यांनी हे नवीन आव्हान उभे केले आहे.
चौकट
गुरख्याच्या सतर्कतेमुळे मोठे संकट टळले
आखाडा बाळापूर येथील व्यापारपेठ मोठी असून चोरट्यांनी मोठ्या धाडसाने दहा दुकाने फोडली. परंतु, चोरट्यांच्या हालचालींचा कानोसा गुरख्याला लागल्याने तो त्या दुकानांकडे जात होता. परंतु, चोरट्यांची संख्या अधिक असल्याचे पाहून त्याने बाजूला जाऊन पोलिसांना खबर दिली. त्यामुळे पोलिसांची गाडी लागलीच हजर झाल्याने चोरट्यांनी पळ काढला.
चौकट
मद्यपान करण्यासाठी हाॅटेलातील चिवडा व बिसलेरी बॉटल वापरल्या
आखाडा बाळापूर येथे चोरी करताना चोरट्यांनी निवांतपणे आपले काम केले आहे. मुख्य रस्त्यावरील नॅशनल हॉटेलचे कुलूप तोडून हॉटेलमध्ये प्रवेश केला. हॉटेलातील चिवडा चकणा म्हणून वापरला. पाणी बॉटल दारूसोबत पिण्यासाठी वापरले. जाताना तोडफोड करून निवांत निघून गेले. मुख्य रस्त्यावर व बाळापूर पोलीस ठाण्याच्या नजरेसमोर असलेल्या हॉटेलातही चोरट्यांनी प्रवेश केला हाेता.
एलसीबी अधिकाऱ्यांकडून घटनास्थळी भेट
बाळापुरातील चोरीच्या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली असून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक खंडेराय, पोलीस उपनिरीक्षक शिवसांब घेवारे व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कर्मचारी यांच्या पथकाने बाजारपेठेत भेट देऊन व्यापाऱ्यांशी चर्चा केली. काही दुकानांतील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. त्यावेळी रात्री १.१० वाजल्यापासून २.४० वाजेपर्यंत चोरट्यांच्या हालचाली अंधुकरित्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत होत्या. फाेटाे नं.१२,१३,१४