हिंगोली : अकरावी, बारावीसाठी पैकीच्या पैकी मिळणारे अंतर्गत मूल्यमापणाचे गुण लक्षात घेता गावाजवळच्या महाविद्यालयांत प्रवेश घेण्याकडे विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे. गतवर्षी जवळच्या महाविद्यालयातच प्रवेश मिळावा यासाठी पालकांसह विद्यार्थ्यांना चांगलीच धावपळ करावी लागली होती. यावर्षी दहावीचा निकाल उंचावला असून विद्यार्थी आतापासूनच प्रवेशासाठी तयारी करीत आहेत.
ग्रामीण भागात दहावीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर अकरावीसाठी मोठ्या शहरातील महाविद्यालयात प्रवेश घेण्याकडे विद्यार्थ्यांचा कल असायचा. जिल्ह्यातील बहुतांश विद्यार्थी नांदेड, औरंगाबादसारख्या शहरात शिक्षणासाठी जात होते. त्यामुळे विद्यार्थी मिळविण्यासाठी ग्रामीण भागातील संस्थाचालक, प्राचार्य आटापिटा करीत होते. मागील दोन ते तीन वर्षांपासून शहरी महाविद्यालयात प्रवेश घेण्याबाबत विद्यार्थ्यांमध्ये उदासीनता दिसत आहे. गावाजवळ असलेल्या महाविद्यालयात प्रवेश घेण्याकडे विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे. त्यामुळे दोन वर्षांपासून ग्रामीण भागातील महाविद्यालयेदेखील विद्यार्थ्यांनी गजबजत आहेत. गतवर्षी दहावीचा ९१,९४ टक्के निकाल लागला होता. तरीही ग्रामीण भागातील महाविद्यालयात अकरावीच्या प्रवेशासाठी विद्यार्थी, पालकांची चांगलीच धावपळ झाली होती. या वर्षी तर दहावीचा निकाल उंचावला असून निकाल ९९.२५ टक्के लागला आहे. तब्बल १६ हजार २०५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. अकरावी प्रवेशासाठी सीईटी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाणार असले तरी काही विद्यार्थी, पालक आतापासूनच जवळच्या महाविद्यालयात प्रवेश मिळावा, यासाठी धावपळ करताना दिसत आहेत.
अकरावीसाठी गावात प्रवेश का?
अकरावी, बारावीला ३० गुण अंतर्गत मूल्यमापनाला दिले जातात. ग्रामीण भागातील महाविद्यालयात जास्तीत जास्त गुण दिले जातात. तसेच काही विद्यार्थी अकरावीपासूनच बारावी व साईटीच्या अभ्यासाला लागतात. एकदा ग्रामीण महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर शहरी भागात क्लासेस लावण्यावरही काही पालकांचा भर असतो. त्यामुळेही अकरावीला ग्रामीण भागात प्रवेश घेण्याकडे विद्यार्थ्यांचा ओढा असतो.
वरिष्ठांच्या सूचनेनुसार प्रवेश
अकरावीच्या प्रवेशासंदर्भात अद्याप वरिष्ठ स्तरावरून सूचना मिळाल्या नाहीत. वरिष्ठांच्या सूचनेप्रमाणे अकरावीला विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जातील. सध्या प्रवेशासंदर्भात काही सांगता येणार नाही.
- डी. बी. जोशी, प्राचार्य, बाराशीव हनुमान कनिष्ठ महाविद्यालय, बाराशीव
दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांकडे टी. सी. उपलब्ध होण्यास वेळ लागेल. अकरावीच्या प्रवेशासाठी विद्यार्थी विचारणा करीत आहेत. त्यांच्याकडून आधार कार्ड व प्रवेश फार्म भरून घेतला जात असून तात्पुरता प्रवेश दिला जात आहे.
- गोविंद वाघ, प्राचार्य, गोकुळनाथ क. महाविद्यालय, आडगाव रंज
अकरावीसाठी हवा असलेला अभ्यासक्रम ग्रामीण भागातही उपलब्ध झाला आहे. शिवाय महाविद्यालय गावाजवळ असल्याने खर्चात बचत होते. तसेच ओखळीचे प्राध्यापक असल्याने अभ्यासाविषयी अडचण येत नाही.
-ऋषिकेश खराटे
ग्रामीण भागातही विविध अभ्यासक्रम उपलब्ध झाले असून क्लासेसही घेतले जातात. घर जवळ असल्याने अनावश्यक खर्च वाचतो. त्यामुळे शहरात प्रवेश न घेता ग्रामीण भागातील महाविद्यालयात प्रवेश घेतला.
-गणेश खराटे
जिल्ह्यात अकरावी प्रवेश देणारी कनिष्ठ महाविद्यालये - ११२
एकूण जागा - २०३६०
गेल्या वर्षी किती जणांनी प्रवेश घेतला - १८२५५
किती जागा रिक्त राहिल्या - २१०५