लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : अल्पसंख्याकांच्या विकासासाठी शासनाने बहुउद्देशीय विकास कार्यक्रमात मंजूर केलेल्या कामांपैकी जवळपास आठ कोटींचा निधी परत जाण्याची भीती होती. डीएसआरचे दर वाढल्याने या रकमेत ही कामे होणे अशक्य असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र आता या कामांत बदल करून निविदा काढल्याने कामे होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.हिंगोली तालुकाच या योजनेत समाविष्ट होता. यात प्राथमिक शाळांमध्ये ४२ ठिकाणी शाळाखोल्या उभारण्यात येणार होत्या. यापैकी ३ ठिकाणच्या ७ खोल्या रद्द केल्या. तर ३९ ठिकाणच्या ४५ खोल्यांची निविदा काढली आहे. अतिरिक्त वर्गखोल्यांची ८ ठिकाणी १६ कामे होणार असून त्याचीही निविदा काढली आहे. प्रथामिक शाळांत वर्गखोली बांधकाम आणि नूतनीकरणाची १७ ठिकाणी ८0 कामे मंजूर होती. यापैकी १४ ठिकाणची ६७ कामे निविदेत आहेत. तर एका ठिकाणचे सहा खोल्यांचे काम सुरू आहे. उच्च प्राथमिक शाळेत २ ठिकाणी प्रयोगशाळेच्या निविदा काढल्या आहेत. तर शाळा उन्नतची ५ ठिकाणची चार कामे निविदेत आहेत. तीन ठिकाणच्या माहेरघराच्या तर आठ ठिकाणच्या आरोग्य उपकेंद्रांच्या निविदा अजून काढणे बाकी आहे. सध्या या कामांची अंदाजपत्रके तयार झाली असून तांत्रिक मान्यताही मिळाली आहे. प्रत्येकी ५0 लाखांचे उपकेंद्राचे काम असल्याने याचेच जवळपास ४ कोटी परत गेले असते. मात्र एनआरएचएममधून मंजुरी मिळाल्याने दोन आरोग्य केंद्राची कामे रद्द केली आहेत.या योजनेची कामे गतवर्षीच पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र ती झाली नसल्याने यंदाही निविदा प्रक्रिया वेळेत केली नाही. आता जीएसटी कर लागल्यानंतर वाढीव दराने हे बांधकाम करणे परवडणारे नव्हते त्यामुळे कंत्राटदार नकारघंटा वाजवत होते. याबाबत लोकमतमधून वृत्तप्रकाशित केले होते. निधी परत करण्याची तयारी दिसत होती. मात्र खोलीचे काम पूर्ण करून व्हरांड्याचा आकार लहान करून अथवा शाळाखोल्यांची कामे दुमजली करून यात मध्यममार्ग काढला आहे. त्यामुळे आता निधी परत जाणार नाही.या योजनेतील कामे लवकर सुरू व्हावीत, यासाठी मुकाअ एच.पी.तुम्मोड, अति.मुकाअ ए.एम.देशमुख यांनी संबंधितांना सूचना दिल्या आहेत. तर त्यासाठी वारंवार आढावाही घेतला जात असल्याचे सांगण्यात आले.
एमएसडीपीमध्ये अखेर निविदा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 12:24 AM