हिंगोली : महिलेच्या विनयभंग प्रकरणात न्यायालयीन कोठडी सुनावलेला आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देवून पसार झाला. या आरोपीस शुक्रवारी सायंकाळी जिल्हा रूग्णालयात आरटीपीसीआर व अन्य तपासणीसाठी आणले होते. शनिवारी दुपारपर्यंत तो पोलिसांच्या हाती लागला नव्हता.
हिंगोली तालुक्यातील कानडखेडा खु. येथील एका ३० वर्षीय महिलेच्या घरात गावातील गणेश रमेश भगत हा २ फेब्रुवारी रोजी घुसला होता. यावेळी त्याने महिलेचा विनयभंग केला. तसेच तिच्या पतीलाही अश्लिल भाषेत शिविगाळ केली होती. याप्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून ३ रोजी गोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता. त्यानंतर पोलिसांनी गणेश रमेश भगत यास अटक करून न्यायालयासमोर उभे केले होते. यावेळी न्यायालयाने त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली. तत्पूर्वी शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास आरोपीस जिल्हा रूग्णालयात तपासणीसाठी पोलीस घेऊन आले होते.
जिल्हा रूग्णालयात रात्री ७ वाजेच्या सुमारास त्याची आरटीपीसीआर, ॲटीजेन व सर्वसाधारण तपासणी सुरू होती. पोलिसांनी आरोपीचा हात पकडलेला होता. मात्र याच वेळी दवाखान्यात असलेल्या गर्दीचा फायदा घेत त्याने पोलिसांच्या हाताला झटका देत पळ काढला. त्यानंतर पोलिसाांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र तो सापडला नाही. शनिवारी दुपारपर्यंतही पोलीस त्याचा शोध घेत होते. दरम्यान, रात्री उशिरा पोलीस अमलदार विजय महाले यांच्या फिर्यादीवरून गणेश रमेश भगत याचेविरूद्ध हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. सहायक पोलीस उप निरीक्षक टाले तपास करीत आहेत.