हिंगोली : राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांना वेतन देण्यात यावे यासह इतर प्रलंबित मागण्यांसाठी एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी ३ सप्टेंबरपासून धरणे आंदोलन सुरू केले आहे. परिणामी, ‘लालपरी’ची चाके थांबली असून, दुपारी १२ वाजेपर्यंत हिंगोली जिल्ह्यातील तिन्ही आगारातंर्गत ३८५ फेऱ्या रद्द झाल्या आहेत. प्रवाशांचीही तारांबळ उडाली आहे.
राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना वेतन देण्यात यावे, महागाई भत्त्याची थकबाकी देण्यात यावी, वार्षिक वेतनवाढीच्या व परभाडे भत्त्याच्या वाढीव दराची थकबाकी द्यावी यासह इतर प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कर्मचारी संयुक्त कृती समितीने राज्यस्तरीय धरणे आंदोलन पुकारले आहे.
या आंदोलनात जिल्ह्यातील तिन्ही आगारातील बसचालक, वाहकांसह काही कर्मचारीही सहभागी झाले आहेत. त्यामुळे सकाळपासून एक- दोन वगळता संपूर्ण बसफेऱ्या रद्द झाल्या आहेत. यात हिंगोली आगारातंर्गत १५०, वसमत १४० तर कळमनुरी आगारातंर्गत जवळपास ९५ बसफेऱ्या रद्द झाल्या. बसफेऱ्या रद्द झाल्याने प्रवाशांची तारांबळ उडाली आहे.
दरम्यान, ऐन सणासुदीच्या दिवसात एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसल्याने याचा परिणाम महामंडळाच्या उत्पन्नावर तर होणारच आहे. शिवाय प्रवाशांचीही तारांबळ उडत आहे.