- इस्माईल जहागीरदारवसमत : तालुक्यातील सिरळी येथील अल्पभूधारक शेतकरी बालाजी पुंडगे यांनी बैलजोडी नसल्याने भाऊ व भाचाच्या खांद्यावर जू देत हळदीच्या शेतात सरी मारल्या होत्या. या बाबतचे वृत्त लोकमतमध्ये प्रकाशित झाले होते. या वृत्ताची दखल कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी घेत स्वत:च्या पैशातून शेतकऱ्यास बैलजोडी उपलब्ध करून दिली. गुरूवारी ही बैलजोडी शेतकऱ्यांच्या स्वाधीन केली. वसमत तालुक्यातील सिरळी येथील अल्पभूधारक शेतकरी बालाजी पुंडगे यांना दोन एकर शेत जमीन आहे. दोघा भावांचा यावर उदरनिर्वाह चालवतो. त्यांनी आर्धा एकर शेतात हळद लागवडीचे नियोजन केले आहे. जमीन कमी असल्यामुळे बैलजोडी घेणे परवडत नाही. तसेच सध्या खरीपाची लगबग असल्याने इतर शेतकऱ्यांकडून बैलजोडी मिळणे अवघड बनले होते. त्यामुळे हळद लागवडीसाठी शेतात सरी कशी मारायची याची चिंता त्यांना होती. त्यामुळे त्यांनी भाऊ व भाच्याच्या खांद्यावर जु देत सरी मारण्याचा निर्णय घेतला. भाऊ व भाचाला जु ला जुंपत २४ जून रोजी दिवसभर शेतात सरी मारल्या. शेतकऱ्यांची चाललेली धडपडीबाबत लोकमतने २५ जूनच्या अंकात प्रकाशित केले होते.
या बातमीची आमदार राजू नवघरे यांनी दखल घेत ही माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांना दिली. त्यांनी शेतकऱ्याबद्दलची माहिती घेत बैलजोडी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार २७ जून रोजी शेतकऱ्याच्या बांधावर बैलजोडी दाखल झाली. थेट कृषिमंत्र्यांनी बैलजोडी पाठवलेली पाहून पुंडगे कुटूंबिय भावूक झाले होते. यावेळी राष्ट्रवादी कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष बी.डी. बांगर, कांचन शिंदे,आदित्य आहेर, महेश व्हडगीर,त्र्यंबक कदम,प्रशांत शिंदे, पिंपळदरीचे सामाजिक कार्यकर्ते बापुराव घोंगडे आदींची उपस्थिती होती.
लोकमतचे मानले आभार...लोकमतमध्ये वृत प्रकाशित होताच माझ्या सारख्या सामान्य शेतकऱ्यांची दखल घेतली गेली. शेतकऱ्यांचे दुख काय याची जान करुन देण्यात लोकमतचा वाटा खूप मोठा आहे. लोकमतचे आभार व्यक्त करतो.-बालाजी पुंडगे, शेतकरी