हिंगोली : येथील बसस्थानक परिसरात २७ सप्टेंबर रोजी ७० वर्षीय अनोळखी वृद्धाचा मृतदेह आढळला होता. पोलिसांनी ओळख पटविण्याचा प्रयत्न केला. मात्र कोणीही नातेवाईक पुढे आला नसल्याने शेवटी नगरपालिका व महसूल कर्मचाऱ्यांच्या मदतीने नातेवाईक बनून पोलिसांनी २९ सप्टेंबर रोजी अंत्यसंस्कार केले.
हिंगोली येथील बसस्थानक परिसरात असलेल्या कॉम्पेक्सजवळील मोकळ्या जागेत ७० वर्षीय व्यक्तीचा मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून हिंगोली शहरचे पोलीस निरीक्षक पंडित कच्छवे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार संजय मार्के व अमजद शेख यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. त्यांनतर मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. ओळख पटविण्यासाठी मृतदेह शितपेटीत ठेवण्यात आला होता. अनेक व्हॉट्सॲप ग्रुप व मिसिंग प्रकरणाची माहिती घेत पोलिसांनी ओळख पटविण्याचा प्रयत्न केला.
दोन दिवसानंतरही कोणीच नातेवाईक पुढे आला नाही. त्यामुळे डॉक्टरांनी शवविच्छेदन केले. त्यानंतर अनोळखी मृतदेहाचे नातेवाईक बनून जमादार संजय मार्के, अमजद शेख, तलाठी इंगोले, नगरपालिकेचे कर्मचाऱ्यांनी येथील रिसाला बाजार भागातील स्मशानभूमित अंत्यसंस्कार केले. यामुळे या कर्मचाऱ्यांचे कौतूक होत आहे.