हिंगोली: औंढा तालुक्यातील येथून जवळ असलेल्या पोटा (शेळके) येथील बंधाऱ्याच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम ‘एक मराठा लाख मराठा’ अशी घोषणा देत उधळून लावला. मराठा समाजाच्या आक्रमक पवित्र्यानंतर नियोजित कार्यक्रम रद्द करावा लागला.
औंढा नागनाथ तालुक्यातील पोटा (शेळके) येथे पूर्णा नदीवर उच्चतम पातळीचे बंधारे मंजूर झाले आहेत. या बंधाऱ्याचे २९ फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजता भूमिपूजनाचा कार्यक्रम पोटा (शेळके) येथे हिंगोली लोकसभेचे खा. हेमंत पाटील यांच्या हस्ते होणार होता. भूमिपूजनाचाी माहिती परिसरातील सकल मराठा समाजाला कळाली. यानंतर सकल मराठा समाजाचे काही कार्यकर्ते आक्रमक झाले. यावेळी खा. हेमंत पाटील यांना उद्घाटनास येऊ दिले देणार नाही, अशी आक्रमक भूमिका मराठा समाजाने घेतली. त्यामुळे सकाळपासूनच परिसरातील सकल मराठा समाज गोळा झाला.
यावेळी खा. हेमंत पाटील यांचा निषेध करण्यात आला. जोपर्यंत मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळत नाही. तोपर्यंत कोणत्याही नेत्याला गावात येऊ देणार नाही, असा पवित्रा समाजबांधवांनी घेतला. सरकारने समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावे, असा पवित्रा घेण्यात आला. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही. तोपर्यंत सर्वच पक्षाच्या नेत्यांना गावबंदी केली आहे. मग भूमिपूजन कोणाला विचारुन करता, असे म्हणत घोषणे देणे सुरु केले. नेत्यांनी गावात येतेवेळेस मराठा समाजाला विचारावे, असाही प्रश्न विचारला गेला. अखेर खा. पाटील यांनी नियोजित ठिकाणी भूमिपूजनाला येण्याचे टाळले. त्यामुळे भूमिपूजनाचा कार्यक्रम रद्द झाला.