काँग्रेस पक्षाने दाखविलेला विश्वास; प्रज्ञा सातव दुसऱ्यांदा विधानपरिषदेवर
By प्रसाद आर्वीकर | Published: July 15, 2024 01:16 PM2024-07-15T13:16:36+5:302024-07-15T13:17:19+5:30
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मिळालेल्या विजयानंतर विधान परिषदेसाठी मुस्लीम समाजातून उमेदवार द्यावा, अशी जोरदार चर्चा होती. त्यादृष्टीने तयारीही केली जात होती.
हिंगोली : विधानपरिषद निवडणुकीतील विजयानंतर आमदार प्रज्ञा सातव यांना विधान परिषदेवर दुसऱ्यांदा संधी मिळाली आहे. काँग्रेस पक्षाने त्यांच्यावर दाखविलेला विश्वास सातव यांनी सार्थ करून दाखविला आहे.
विधानसभेतील आमदारांमधून विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या एका जागेसाठी काँग्रेस पक्षात मोठी स्पर्धा होती. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मिळालेल्या विजयानंतर विधान परिषदेसाठी मुस्लीम समाजातून उमेदवार द्यावा, अशी जोरदार चर्चा होती. त्यादृष्टीने तयारीही केली जात होती. मात्र लोकसभेतील विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांनी दुसऱ्यांदा प्रज्ञा सातव यांना उमेदवारी देऊन काँग्रेस पक्षासाठी काम करणारा नेता, पदाधिकारी, सामान्य कार्यकर्ता आणि कुटुंब काँग्रेससाठी किती महत्त्वपूर्ण आहे, हेच दाखवून दिले आहे. त्यामुळे काँग्रेससाठी देखील सातव यांचा विजय एका अर्थाने महत्त्वपूर्ण होता.
राहुल गांधी यांचे विश्वासू सहकारी राहिलेले दिवंगत खासदार राजीव सातव यांच्या आकस्मिक निधनानंतर गांधी परिवार त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहिला. २०२१ मध्ये काँग्रेसने प्रज्ञा सातव यांना विधान परिषदेची उमेदवारी दिली. या निवडणुकीत त्या बिनविरोध निवडून आल्या. या विजयाने प्रज्ञा यांची राजकारणात एन्ट्री झाली. मात्र काम करण्यासाठी साधारणत: दोन ते अडीच वर्षांचा अल्पसा कार्यकाळ त्यांना मिळाला. त्यामुळे काँग्रेसने यावेळेस पुन्हा एकदा आ. सातव यांना उमेदवारी दिली. या निवडणुकीत त्या विजयी झाल्याने दुसऱ्यांदा विधान परिषदेत प्रतिनिधित्व करणार आहेत.
मोठा राजकीय वारसा
सातव यांना कुटुंबातूनच राजकीय वारसा लाभला आहे. पती दिवंगत राजीव सातव यांनी कमी कालावधीत राजकारणात आपला वेगळा ठसा उमटविला. त्यांनी २००९ मध्ये आमदार, २०१४ मध्ये खासदार आणि २०२० मध्ये राजसभा सदस्य म्हणून कार्य केले आहे. राहुल गांधी यांचे निकटवर्तीय आणि विश्वासू सहकारी अशी त्यांची ओळख होती. जिल्ह्यात अनेक विकासकामे त्यांच्या माध्यमातून मार्गी लागली आहेत. आमदार प्रज्ञा सातव यांच्या सासूबाई दिवंगत रजनी सातव यांनी पाच वेळा राज्यमंत्री म्हणून राजकारणात ठसा उमटविलेला आहे.