हिंगोली : येथील बाजार समितीच्या मार्केट यार्डातील व्यवहार मागील पाच दिवसांच्या बंदनंतर ३ ऑक्टोबरपासून सुरू झाले. या दिवशी १ हजार ८०० क्विंटल हळद विक्रीसाठी आली होती. आवक वाढल्यामुळे मात्र भावात घसरण झाल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर निराशा दिसून आली.
यंदा हळदीला ऑगस्टमध्ये मागील तेरा वर्षातील उच्चांकी दर मिळाला. सरासरी १५ ते १७ हजार रूपये क्विंटलने हळद विक्री झाली. आणखी दर वधारतील किंवा स्थिर तरी राहतील अशी आशा शेतकऱ्यांना होती. परंतु, सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून भावात घसरण सुरू झाली. जुलै, ऑगस्टच्या तुलनेत आवक कमी होत असली तरी भावात घसरण होत गेल्याने शेतकऱ्यांची निराशा झाली. त्यातच २८ सप्टेंबर गणेश विसर्जनापासून मार्केट यार्ड बंद ठेवण्यात आले होते. त्यानंतर ३ ऑक्टोबर रोजी आवक १ हजार ८०० क्विंटल झाली होती. या दिवशी भाव समाधानकारक मिळेल अशी आशा होती. परंतु, किमान १० हजार ८०० ते १२ हजार ८५० रूपये दर मिळाला. ऑगस्टच्या तुलनेत तब्बल तीन ते चार हजारांनी भाव घसरल्याने शेतकऱ्यांतून नाराजी व्यक्त होत होती.
मूगाला मिळाला सरासरी ११ हजार ६०० चा भाव...येथील बाजार समितीच्या मोंढ्यात मंगळवारी २० क्विंटल मूगाची आवक झाली होती. किमान १० हजार ३०० ते कमाल १३ हजार रूपये भाव मिळाला. यंदा मूगाला समाधानकारक भाव मिळत असला तरी उत्पादन कमी आहे. त्यामुळे भाववाढीचा फायदा शेतकऱ्यांना होत नसल्याचे चित्र आहे.
सोयाबीनची आवक वाढली...भाववाढीच्या प्रतीक्षेत मागील आठ ते नऊ महिन्यांपासून काही शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीविना ठेवले. आता आठवड्यापासून बाजारात नवे सोयाबीन आले आहे. त्यामुळे आवक वाढली आहे. ३ ऑक्टोबरला ८०० क्विंटल सोयाबीन विक्रीसाठी आले होते. नवे सोयाबीन आले तरी भाव मात्र पडतेच आहेत. त्यामुळे यंदाही सोयाबीन उत्पादकांच्या पदरी निराशाच येण्याची चिन्हे आहेत. जुने आणि नवे एकाच भावात जात असल्यामुळे इतक्या दिवस सोयाबीन विक्रीविना ठेवून काहीच फायदा झाला नसल्याचे शेतकरी सांगत आहेत.