हिंगोली : वाळूने भरलेल्या टिप्परची माहिती पोलिसांना का दिली, या कारणावरून भाजप युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षासह अन्य काहींनी एकाची जीप व टिप्पर पेटवून दिल्याची घटना ८ जुलैच्या रात्री घडली. याप्रकरणी हिंगोली शहर पोलीस ठाण्यात दोघांविरूद्ध तर ग्रामीण पोलीस ठाण्यात चौघांविरूद्ध गुन्हा नोंद झाला आहे.
याबाबत पंकज रामकिशन होडगीर (रा. मंगळवारा महादेववाडी हिंगोली) यांनी दोन्ही पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पंकज होडगीर हे ७ जुलै रोजी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास गोळेगाव येथून हिंगोलीकडे येत होते. यावेळी औंढा टी पॉईंटवर आले असता त्यांच्या स्कॉर्पिओ जीपसमोर वाळूने भरलेले टिप्पर होते. पुढे वाळूचे टिप्पर पकडून औंढा पोलिसांनी ठाण्यात लावले. तर होडगीर हे हिंगोली येथे आले. होडगीर यांनीच टिप्परची माहिती पोलिसांना दिल्याच्या कारणावरून भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष पप्पू उर्फ असराजी चव्हाण व अन्य काही जणांनी ८ जुलैच्या रात्री अडीच ते सव्वा तीन वाजेच्या सुमारास पंकज होडगीर यांच्या महादेववाडी भागात उभी केलेली स्कार्पिओ जीप व लिंबाळा मक्ता भागात उभ्या असलेल्या टिप्परलाही आग लावली.
यात जीपचे १५ लाखांचे तर टिप्परचे ३५ लाखांचे नुकसान झाले. याप्रकरणी पंकज रामकिशन होडगीर यांच्या फिर्यादीवरून हिंगोली शहर व ग्रामीण पोलीस ठाण्यात पप्पू उर्फ असराजी चव्हाण, सुमित घिके (दोघे रा. शिक्षक कॉलनी अकोला बायपास, हिंगोली) यांचेसह अन्य दोघांविरूद्ध गुन्हा नोंद झाला आहे. पोलीस हवालदार वाठोरे, पोलीस नाईक राठोड तपास करीत आहेत.