हिंगोली : सोमवारची पहाट जोरदार पाऊस तर मंगळवारची पहाट गडद धुके घेवून आली. मागील तीन दिवसांपासून हिंगोली जिल्ह्यात वातावरण बिघडले असून थंडीची लाट आल्यासारखे चित्र निर्माण झाले आहे.
हिंगोली जिल्ह्यात रविवारी ढगाळ वातावरण होते. रविवारी रात्रीपासून पावसाला सुरूवात झाली. सोमवारी पहाटेपर्यंत हा पाऊस बरसत होता. थोड्या विश्रांतीनंतर सोमवारी दहा ते अकरा वाजेपर्यंत विविध भागात रिपरिप सुरू होती. या पावसामुळे काही भागात पिकांचे मोठे नुकसान झाले. जवळपास १२ मंडळांमध्ये ६५ मिमीपेक्षा जास्त पाऊस पडला. तर इतर अनेक मंडळांमध्येही त्याच्या जवळपास पाऊस झाला आहे. या पावसामुळे नजीकच्या काळात कराव्या लागणाऱ्या टंचाई उपाययोजना लांबणीवर पडल्या. नदी व नाल्यांनाही पाणी आले.सोमवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. मंगळवारी पहाटे या ढगाळ वातावरणाचा परिणाम म्हणून सगळीकडे दाट धुके पडले होते. राष्ट्रीय महामार्गांवर यामुळे दिवस उजाडला तरीही धुक्यात काही दिसत नसल्याचे जाणवत होते. हळूहळू हे धुके कमी झाले तरीही दहा वाजेपर्यंत त्याचा प्रभाव जाणवत होता. काही भागात या धुक्यासोबतच पावसाची भुरभुरही दिसून आली. त्यामुळे रस्ते ओले होतील, अशी ही भुरभुर जाणवत होती.
थंडीचा कडाका वाढलाढगाळ वातावरणामुळे आधी थंडी गायब झाली होती. मात्र पाऊस पडल्यानंतर या ढगाळ वातावरणामुळे थंडीचा कडाका वाढल्याचे जाणवत आहे. त्यातच सूर्यदर्शनही नसल्याने दिवसाच हुडहुडी भरत असल्याने अनेकांनी उबदार कपड्यांचा आधार घेतल्याचे दिसत होते.