- बापूराव इंगोले नर्सी नामदेव (जि. हिंगोली): ‘नामा म्हणे धन्य झाले ते संसारी, न सांडिती वारी पंढरीची’ असे म्हणत हजारो भाविकांनी कामिका एकादशीनिमित्त भल्या पहाटे रांगेत उभे राहून पंढरीच्या विठुरायाचे सर्वात लाडके भक्त राष्ट्रीय संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या मूर्तीचे दर्शन घेतले. नर्सी नामदेव येथे ३१ जुलै रोजी परतवारी कामिका एकादशीनिमित्त मराठवाड्यासह विदर्भातून आलेल्या लाखो भाविक वारकऱ्यांनी संत नामदेवांचे दर्शनासाठी घेण्यासाठी अलोट गर्दी केली होती.
बुधवारी परतवारी एकादशीनिमित्त सकाळी ६ वाजेदरम्यान ‘श्री’ च्या वस्त्र समाधीस आ. तान्हाजी मुटकुळे, भिकूलाल बाहेती, भिकाजी कदम, ओमप्रकाश हेडा यांच्या हस्ते मानाचा आहेर अर्पण करून विधिवत समाधीची महापूजा करण्यात आली. यावेळी संस्थांनचे उपाध्यक्ष भिकाजी किर्तनकार, सचिव व्दारकादास सारडा, विश्वस्त भागवत सोळंके, सुभाष हुले, ब्रिजगोपाल तोष्णीवाल आदी उपस्थित होते.
महापूजेनंतर मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी खुले करण्यात आले. यावेळी भल्या पहाटेपासूनच वारकरी भाविक हे शेकडो पायदळ दिंड्या समवेत खांद्यावर भगवी पताका, डोक्यावर तुळशी वृंदावन, हाती टाळ, मृदंग व मुखी विठूनामाचा गजर करीत नामदेवांच्या दर्शनासाठी दाखल झाल्याने मंदिर परिसरातील वातावरण अगदी भक्तिमय झाले होते. त्यामुळे अवघी पंढरी नर्सी येथे अवतरल्याचे चित्र दिसून आले. आषाढी एकादशीच्या वारीला जे भाविक विठ्ठलाचे दर्शन घेतात ते भाविक मात्र परतवारी एकादशीला संत नामदेवाचे दर्शन घेऊन वारी पूर्ण करतात, हे विशेष आहे. त्यामुळे ठिकठिकाणावरुन भाविक मिळेल त्या वाहनाने येथे दाखल होतात. पहाटे पासूनच भाविकांनी मंदिर परिसरात नामदेवाच्या दर्शनासाठी रांगा लावून मोठी गर्दी केली होती.
दर्शनासाठी दर्शन बारीची व्यवस्था...संत नामदेवाच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना सुलभ दर्शन घेता यावे, यासाठी मंदिर परिसरात दर्शन बारीची व्यवस्था तसेच सर्व भाविकांसाठी ठिकठिकाणी चहा पाणी फराळाची व्यवस्था देखील करण्यात आली होती.
लांबच लांब वाहनांच्या रांगा..परतवारी एकादशीला नामदेवांच्या दर्शनासाठी भाविकांची संख्या मोठी असल्याने हिंगोली सेनगाव रोडवर तीन किलोमीटर अंतरावर दुतर्फा भाविकांच्या वाहनांच्या पार्कींगची व्यवस्था केल्याने लांबच रांगा लागल्या. त्यामुळे रोडवर काही वेळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.
ठिकठिकाणी चोख पोलिस बंदोबस्त....बसथांबा ते संत नामदेव महाराज मंदिर भाविकांच्या गर्दीने फुलून गेले असल्याने नर्सी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बी. के. सानप यांनी ठिकठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. शिवाय संस्थानच्या वतीने स्वयंसेवक महिला-पुरुषांची ठिकठिकाणी नियुक्ती केली होती. भाविकांच्या पादत्राणासाठी मंदिर परिसरात काळकोंडी येथील शिवप्रेमी मित्र मंडळाच्या वतीने मोफत व्यवस्था करण्यात आली होती.