कळमनुरी : हिंगोली - नांदेड मार्गावर माळेगाव पूलाच्या समोर चालकाचा ताबा सुटल्याने कार उलटून फौजदारांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रात्री 10.10 वाजता घडली. निळकंठ दंडगे असे मृत फौजदारांचे नाव आहे.
याबाबत प्राथमिक माहिती अशी की, फौजदार नीलकंठ दंडगे, शिवाजी गायकवाड, गजानन राठोड हे तिघे कामानिमित्त हिंगोलीहून आखाडा बाळापूरकडे कारने (क्रमांक जीजे-05 जेएस-2534) जात होते. दरम्यान, हिंगोली- नांदेड मार्गावर माळेगाव पुलाच्या समोर चालकाचा ताबा सूटल्याने कार उलटली. यात कारमधील तिघेही गंभीर जखमी झाले.
अपघाताची माहिती कळमनुरी पोलिसांना मिळताच पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे, जमादार दिलीप पोले ,देविदास सूर्यवंशी, माधव भडके यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी जखमींना तातडीने येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. येथे डॉक्टरांनी तपासून पोलीस उपनिरीक्षक निळकंठ दंडगे ( 44 ) यांना तपासून मृत घोषित केले. तर शिवाजी गायकवाड ,गजानन राठोड यांच्यावर प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी त्यांना हिंगोली व नांदेडकडे रवाना केले.
नागपूर येथे होते कार्यरतनिळकंठ दंडगे हे नागपूर शहर येथे पोलीस उपनिरीक्षक या पदावर कार्यरत होते सध्या ते प्रशिक्षणासाठी एसआरपी कॅम्प येथे आले होते. दोन वर्षांपूर्वीच खात्यांतर्गत परीक्षा देऊन ते पोलिस उपनिरीक्षक झाले होते. ते हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यातील जामगव्हाण गावचे रहिवासी होते. त्यांच्या पश्चात आई, वडिल, पत्नी, दोन मुले असा परिवार असल्याचे सांगण्यात आले.