हिंगोली : येथील बाजार समिती संचालकांच्या बैठकीत एका कंत्राटी कर्मचाऱ्यांनी अंगावर पेट्रोल ओतून घेतल्याची घटना २९ सप्टेंबर रोजी दुपारी १२:३० च्या सुमारास घडली. या घटनेमुळे बाजार समिती वर्तूळात एकच खळबळ उडाली असून, कंत्राटी कर्मचाऱ्यांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
हिंगोली येथील कृषी उत्पन्न बाजार समिती संचालकांची मासीक बैठक सभापती राजेश पाटील गोरेगावकर यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी बोलावण्यात आली होती. यावेळी उपसभापती अशोक सिरामे यांच्यासह संचालक उपस्थित होते. बैठकीदरम्यान संचालक मंडळींमध्ये विविध विषयांवर चर्चा सुरू असताना येथील कंत्राटी कर्मचारी शेषराव सखाराम बांगर यांनी स्वत:च्या अंगावर पेट्रोल ओतून घेतले. हा प्रकार लक्षात येताच या ठिकाणी उपस्थित कर्मचाऱ्यांनी बांगर यांच्या हातातील पेट्रोलची बाॅटल हिसकावून घेत त्याला सावरले. त्यानंतर बांगर यांच्याशी चर्चा करण्यात आली. यादरम्यान मात्र बाजार समितीत एकच गोंधळ उडाला होता. यावेळी संचालक मंडळासह कर्मचारी, तसेच काही मापारी, हमालांची गर्दी जमली होती.
दरम्यान, शेषराव सखाराम बांगर हे मागील २० वर्षांपासून बाजार समितीत कंत्राटी कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत. सेवा ज्येष्ठतेनुसार या कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी समाविष्ट करून घेण्याची मागणी होत आहे. परंतु, अद्याप हा प्रश्न निकाली निघालेला नाही. काही कंत्राटी कर्मचारी न्यायालयातही गेले असल्याची माहिती आहे. परंतु, आज कर्मचाऱ्याने थेट अंगावर पेट्रोल ओतून घेतल्यामुळे बाजार समितीतील कंत्राटी कर्मचाऱ्यांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.