हिंगोली : मागील आठवड्यापासून वातावरणात बदलाचा फटका बसत असून सर्दी, ताप, खोकला, अंगदुखीच्या रुग्णांत वाढ झाली आहे. त्यामुळे मंगळवारी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांच्या रांगा लागल्या होत्या. दिवसभरात ८१४ ओपीडी झाल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.
वातावरणात सतत बदल होत असून, मागील दोन दिवसांपासून पहाटे आणि सायंकाळच्या वेळी गारवा, तर दुपारच्या वेळी वातावरणात उकाडा जाणवत आहे. अशा बदलत्या वातावरणाचा फटका बसत असून, प्रामुख्याने आबालवृद्धांना अधिक त्रास होत आहे. सर्दी, ताप, खोकल्यासह अंगदुखीच्या रुग्णांत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णसंख्या वाढली आहे. दररोज जवळपास ६०० ते ७०० ओपीडींची नोंद होती; परंतु मागील चार दिवसांत रुग्णसंख्या वाढल्याने ओपीडी आठशेंवर गेली आहे.त्यातच रविवारी हक्काची सुटी आणि सोमवारी अयोध्येतील कार्यक्रमानिमित्त सुटी देण्यात आली. यादरम्यान रविवारी तीन तासांची ओपीडी घेण्यात आली; परंतु सुटीत रुग्णांनी येणे टाळले. त्यामुळे मंगळवारी रुग्णांची मोठी गर्दी झाली होती. चिठ्ठी काढण्यासाठी महिला आणि पुरुष रुग्णांच्या रांगा लागल्या होत्या. दिवसभरात ८१४ रुग्णांची नोंद झाल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले.
सर्दी, खोकल्यासह तापाने फणफणले रुग्ण...वातावरण बदलाचा फटका सर्वाधिक आबालवृद्धांना बसू लागला आहे. सर्दी, खोकला, अंगदुखीसह रुग्ण तापाने फणफणत आहेत. त्यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयातील रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. व्हायरल फिव्हरमुळे रुग्णसंख्या वाढल्याचे डाॅक्टरांचे म्हणणे आहे.
बालरोग विभाग हाऊसफुल्ल...रुग्णांमध्ये बालकांचा समावेश अधिक आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालयातील बालरोग विभाग हाऊसफुल्ल झाला आहे. सर्दी, ताप, खोकल्यासह डेंग्यूची लागण झालेले बालरुग्ण या ठिकाणी उपचार घेत आहेत.
वातावरण बदलाचा फटका; नागरिकांची काळजी घ्यावी...वातावरणातील बदलामुळे सर्दी, खोकला, तापाचे रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी. जिल्हा सामान्य रुग्णालयातील ओपीडींत वाढ झाली असून, विविध आजारग्रस्तांची तज्ज्ञांमार्फत तपासणी करून औषधोपचार करण्यात येत आहेत. या ठिकाणी आलेल्या प्रत्येक रुग्णाला वेळेत उपचार मिळावेत, यासाठी रुग्णालय प्रशासनाकडून प्रयत्न केला जात आहे.-डाॅ.नितीन तडस, जिल्हा शल्यचिकित्सक, हिंगोली