कळमनुरी (जि. हिंगोली): तालुक्यातील वारंगा मसाई येथील एका शेतकऱ्याचा जांभरून शिवारातील शेतातील आखाड्यावर धारधार शस्त्राने वार करून खून झाला. ही घटना १२ नोव्हेंबर रोजी सकाळी उघडकीस आली. परंतु खुनाचे कारण मात्र अद्याप स्पष्ट झाले नाही.
कळमनुरी तालुक्यातील वारंगा मसाई येथील साहेबराव नागोजी गिराम (वय ६२) यांचे जांभरून शिवारात शेती असून सध्या शेतात कापसाचे पीक आहे. शेतातील कापूस वेचणी करून ठेवल्यामुळे ते ११ नोव्हेंबर रोजी रात्री जेवण करून शेतात झोपण्यासाठी गेले होते. दरम्यान, १२ नोव्हेंबर रोजी त्यांचा मुलगा शेतात गेला असताना साहेबराव गिराम हे बाजेवर रक्ताच्या थारोळ्यात त्याला पडलेले दिसून आले. सदर घटनेमुळे घाबरलेल्या मुलाने आरडाओरड केली. या घटनेची माहिती तातडीने घरी व गावात सांगितली. त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी व गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
घटनेची माहिती मिळताच पोलिस उप अधीक्षक भुसारे, पोलिस निरीक्षक मोहन भोसले, सहाय्यक पोलिस निरीक्षक हनुमंत भिंगारे, जमादार एस. पी. सांगळे, प्रशांत शिंदे, गजानन होळकर यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तसेच गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विकास पाटील, सहायक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे आदींनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी श्वानपथकालाही बोलावण्यात आले होते. त्यानंतर मृतदेह विच्छेदनासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात आणला होता. घटनास्थळी पोलिस अधीक्षक व अप्पर पोलिस अधीक्षकांनी भेट दिली. मयत साहेबराव गिराम यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले असा परिवार आहे.