हिंगोली : नापिकीमुळे कर्जबाजारी झाल्याने पीककर्ज फेडण्यासाठी शरीराचे अवयव विक्री काढलेल्या शेतकऱ्यांना मुंबईत पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या शेतकऱ्यांनी जलसमाधी आंदोलनाचा इशारा दिल्याने पोलिसांनी ही कार्यवाही केली.
मागील आठ दिवसांपासून सेनगाव तालुक्यातील या शेतकऱ्यांचा हा मुद्दा गाजत आहे. यासाठी त्यांनी आधी स्थानिक पातळीवर निवेदन दिले होते. त्यानंतर त्यांनी थेट मुंबई गाठून सरकारनेच आमच्या अवयवयांची खरेदी करण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी केली होती. त्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनीही या शेतकऱ्यांचे अवयव सरकारने विकत घेतल्यावर त्यांच्याशिवाय आम्ही कसे जगायचे म्हणून आमचे अवयवही घ्या, अशी मागणी केली होती.
दोन दिवसांच्या सुट्यांमुळे शेतकऱ्यांना कुणालाच भेटता आले नाही. त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांची सरकारकडून दखल घेतली जात नव्हती. यामुळे त्यांनी शेवटी ३० नोव्हेंबर रोजी मुंबईत समुद्रात जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.
हे शेतकरी दुपारी २ च्या सुमारास माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी मातोश्रीवर गेले होते. तेथे खा. विनायक राऊत यांची भेट झाली. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना भेटण्यास सांगितले. मात्र हे शेतकरी मातोश्रीच्या बाहेर आल्यानंतर त्यांना खैरवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले.