- इस्माईल जाहागिरदार
वसमत (जि. हिंगोली): कृऊबा बाजार समितीच्या मोंढ्यात गुरुवारी ८ हजार कट्ट्यांची आवक झाली. बोली बिटात ११ हजार ते २२ हजार १०० रुपयांपर्यंत हळदीला दर मिळाला. बुधवारी बिटात हळद २० हजार ५ रुपयांवर पोहोचली होती. हळदीचे १० दिवसांपासून दररोज दर वाढत असल्याने शेतकऱ्यांतून आनंद व्यक्त केला जात आहे. ज्या शेतकऱ्यांनी हळद विक्री न करता ठेवली होती, अशा शेतकऱ्यांना वाढत्या दराचा फायदा होत आहे.
वसमत कृषी उत्पन्न बाजार समिती मोंढ्यात २० जुलै रोजी हळदीच्या ८ हजार कट्ट्यांची आवक झाली. गुरुवारी रोजी हळदीचे बोली बिट झाले. बिटात दर्जेदार हळदीस ११ हजार ते २२ हजार १०० रुपयांचा दर मिळाला. शेतकरी अशोकराव बागल (रा. पार्डी बागल ) येथील शेतकऱ्यांच्या २५ क्विंटल हळदीस सर्वच २२ हजार १०० दर मिळाला आहे. तर अन्य शेतकऱ्यांच्या हळदीस ११ हजार ५०० रुपयांपासून २२ हजारांपर्यंत दर मिळाला. बुधवारी २० हजार ५ रुपयांपर्यत हळदीस दर मिळाला होता. बहुतांश शेतकऱ्यांनी हळद निघताच विक्री केली आहे.
काही शेतकऱ्यांनी दोन वर्षापासून हळद विक्री केली नव्हती. हळदीचे दर वाढतील, अशा अशेवर असलेल्या शेतकऱ्यांनी हळद गोदामात व घरी साठा करुन ठेवली होती. हळदीचे दर वाढताच शेतकऱ्यांनी मोंढ्यात हळद आणण्यास सुरुवात केली आहे. शेतकऱ्यांच्या दर्जेदार हळदीस उच्चांकी दर मिळत आहे. हळदीचा घटलेला पेरा व जून महिन्यात पावसाची दडी हे हळदीचे उत्पन्न घट करणार आहे. भविष्यात हळदीचे उत्पन्न कमी होईल. त्यामुळे हळदीस चांगले दर मिळत आहेत, असे व्यापाऱ्यांनी सांगीतले.
शेतकऱ्यांच्या हळदीस बिटात मिळतो उच्चांकी दर...कृऊबा मोंढ्यात शेतकऱ्यांच्या शेतीमालास योग्य दर मिळत आहे. २० जुलै रोजी झालेल्या बोली बिटात हळदीस २२ हजार १०० रुपयांचा दर मिळाला. बुधवारी २० हजारावर हळद गेली होती. शेतकऱ्यांनी मोंढ्याबाहेर हळद विक्री करु नये, बिटात हळदीस उच्चांकी दर मिळत आहे. शेतीमाल मोंढ्यात विक्री करावा.- तानाजी बेंडे, सभापती कृऊबा वसमत
हेच दर सर्वांना मिळू दे देवा... दरवर्षी हळदीचे उत्पादन घेतो. गत १४ वर्षापूर्वी हळदीस उच्चांकी दर मिळाला होता. दरवेळेस दर्जेदार हळद उत्पन्न करण्याचा प्रयत्न असतो. गुरुवारी ५० कट्टे हळद बिटात काढली होती. सर्वात उच्चांकी २२ हजार १०० रुपयांचा दर मिळाला. हे देवा सर्वाना हे दर मिळू दे.- अशोकराव बागल, शेतकरी, (रा.पार्डी बागल)