- इस्माईल जहागीरदारवसमत: नववधूला आणण्यासाठी रविवारी ( दि. २८) सकाळी निघालेला नवरदेव सासरवाडी सुकळी येथे पोहचलाच नाही. दोन्ही कडील नातेवाईकांनी शोधाशोध करताच नवरदेवाची दुचाकी सुकळी शिवारात सापडली. याप्रकरणी रविवारी रात्री उशिरा कुरुंदा पोलिस ठाण्यात माहिती देण्यात आली. नवरदेवाच्या शोधासाठी पोलिस पथके रवाना झाले आहेत.
२१ एप्रिल रोजी सुकळी वीर येथिल नवरदेव प्रमोद मात्रे ( २५) याचा विवाह सुकळी येथील मुलीशी झाला. त्यानंतर सासरहून नवरी माहेरी आली. तिला आणण्यासाठी रविवारी सकाळी ९ वाजता नवरदेव प्रमोद मात्रे सुकळी वीर येथून निघाला. मात्र, तो सासरी पोहचलाच नाही. नववधूच्या भावाने नवरदेवाच्या वडिलांना फोनवरून विचारपूस केली. प्रमोद सकाळीच निघाला असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानंतर दोन्ही कडच्या नातेवाइकांनी प्रमोदचा शोध सुरू केला. यावेळी सुकळी कोठारी शिवारात नवरदेवाची दुचाकी ( एमएच क्र ३८ झेड २८०६ ) आढळून आली.
याप्रकरणी रविवारी रात्री नवरदेवाचे वडिल नामदेव मात्रे यांनी कुरुंदा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. यावरून कुरुंदा पोलीस ठाण्याचे सपोनि रामदास निरदोडे, फौजदार गवळी, बाभळे, जमादार बालाजी जोगदंड आदी कर्मचाऱ्यांनी शोध सुरू केला आहे.