औंढा नागनाथ (हिंगोली): परिसरात मागील दोन दिवसांपासून होत असलेल्या संततधार पावसाने नदीनाले तुडूंब भरून वाहत आहेत. ६ ऑक्टोबर रोजी रात्री मुसळधार पाऊस झाल्याने येथील ओढ्याच्या पुलावरून पाणी वाहत आहे. यामुळे आज दरेगाव ते औंढा रस्त्यावरील वाहतूक ठप्प होऊन दोन्ही बाजूंनी नागरिक अडकून पडले होते.
परतीच्या पावसाचा कहर पहावयास मिळत आहे. सातत्याने मुसळधार पाऊस पडत असलेल्याने पिकाचेही मोठे नुकसान होत आहे. गुरुवारी रात्री सुरु झालेला पाऊस आज पहाटे देखील सुरु होता. मुसळधार पावसाने दरेगाव औंढा मार्गावरील ओढ्याला पूर आला आहे. आनंदाश्रमजवळील पुलावरून पाणी वाहत आहे. यामुळे लोहरा, दरेगाव, संघ नाईक तांडा, लक्ष्मण नाईक तांडा सावरखेडा यासह सहा गावचा संपर्क तुटला होता.