हिंगोली : प्रतिबंधात्मक कार्यवाही करूनही सतत गुन्हे करणाऱ्या वसमत येथील एकावर एम.पी.डी.ए.अंतर्गंत कारवाई करण्यात आली. त्याची एक वर्षासाठी परभणी येथील कारागृहात रवानगी करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
हिऱ्यासिंग भुऱ्यासिंग चव्हाण (रा. रेल्वेस्टशेन रोड, वसमत) असे एम.पी.डी.ए. अंतर्गंत कार्यवाही करण्यात आलेल्याचे नाव आहे. त्याचेवर वसमत शहर पोलिस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे सहा गुन्हे दाखल आहेत. तसेच त्यास हिंगोली जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले होते. प्रतिबंधात्मक कार्यवाही करूनही तो सतत गंभीर स्वरूपाचे गुन्हे करीत असल्याने तो परिसरातील नागरिकांसाठी धोकादायक बनला होता. त्यामुळे त्याचेवर एम.पी.डी.ए. अंतर्गंत कार्यवाही करावी असा प्रस्ताव पोलिस निरीक्षक चंद्रशेखर कदम यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी संदीपान शेळके यांच्या मार्फत पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांच्याकडे सादर केला होता.
या प्रस्तावाची तपासणी करून त्यांनी हा पस्ताव जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्याकडे सादर केला होता. जिल्हाधिकारी पापळकर यांनी प्रस्तावाची पडताळणी करून हिऱ्यासिंग भुऱ्यासिंग चव्हाण याचेवर एम.पी.डी.ए. अंतर्गंत कार्यवाही करून एक वर्षासाठी कारागृहात स्थानबद्धतेचे आदेश निर्गमित केले. त्यास परभणी येथील मध्यवर्ती कारागृहात दाखल करण्याची प्रक्रीया सुरू होती. या कार्यवाहीसाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पंडित कच्छवे, वसमत शहरचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर कदम, सहायक पोलिस निरीक्षक पंढरीनाथ बोधनापोड , पोलिस निरीक्षक भोसले यांनी महत्वाची भूमिका पार पाडली.