रमेश वाबळे/ हिंगोली
हिंगोली : मराठा आरक्षण आंदोलनाची धग वाढत असून, नांदेड व बीड जिल्ह्यात शनिवारी एसटीबस पेटवून दिल्याची घटना घडली. या पार्श्वभूमीवर राज्य मार्ग परिवहन महामंडळाने सावध पवित्रा घेतला असून, हिंगोली जिल्ह्यातील तिन्ही आगारातून बस बाहेर न काढण्याचे आदेश विभागीय नियंत्रकांनी आगारप्रमुखांना दिले आहेत. त्यामुळे २९ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजेनंतर बसफेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.
आरक्षणासाठी मराठा समाजबांधव एकवटला असून, खेडोपाडी उपोषण करण्यात येत आहे. तसेच सर्व पक्षीय पुढाऱ्यांना गावात प्रवेशबंदीही करण्यात आली आहे. यासंदर्भात गावसीमेवर फलक लावण्यात आले आहेत. शासनाची उदासीनता पाहून मराठा समाजबांधवात संताप व्यक्त होत असून, या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील हिंगोली, वसमत व कळमनुरी या तिन्ही आगारातील बसफेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.
जिल्ह्यातील मोठे आगार म्हणून हिंगोली आगाराकडे पाहिले जाते. या आगारातून दिवसभरात ३७० फेऱ्या होतात. रविवारी दुपारी १ वाजेपासून जवळपास २०० फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच वसमत व कळमनुरी आगारातूनही दुपारनंतर एकही बस बाहेर सोडण्यात येणार नसल्याचे महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
खबरदारी म्हणून बसफेऱ्या रद्द...मराठा समाजबांधवांकडून आरक्षणाच्या मागणीसाठी सध्या सर्वत्र आंदोलन सुरू आहे. शनिवारी बीड व नांदेड जिल्ह्यात बस पेटविण्यात आल्याची घटना घडली. या पार्श्वभूमीवर काही अनुचित घटना घडू नये म्हणून बसफेऱ्या रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आंदोलनाची धग लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला असून, एसटी महामंडळाचे अधिकारी पोलिस विभागाच्या संपर्कात आहेत. सायंकाळी ५ नंतर पुढील निर्णय घेण्यात येईल.- सचिन डफळे,विभागीय नियंत्रक