हिंगोली : वाळूची अवैध वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडण्यासाठी गेलेल्या तलाठ्यास ट्रॅक्टर मालकाने धक्काबुक्की करून पकडून ठेवले. तर चालकाने वाळूसह ट्रॅक्टर पळवून नेले. ही घटना औंढा ना. तालुक्यातील धार व चिमेगाव शिवारात १७ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता घडली. या प्रकरणी औंढा ना. पोलिस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा नोंद झाला.
औंढा ना. तालुक्यातील धार व चिमेगाव शिव रस्त्यावरून एका ट्रॅक्टरमधून वाळूची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती रूपूर सज्जाचे तलाठी सुनील रोडगे यांना मिळाली होती. त्यावरून त्यांनी धार व चिमेगाव शिवारात धाव घेतली. या वेळी एक ट्रॅक्टर येत असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी ट्रॅक्टर थांबवून वाळू वाहतुकीचा परवाना विचारला असता चालकाकडे कोणताही परवाना आढळून आला नाही. त्यामुळे ट्रॅक्टर तहसील कार्यालय येथे घेऊन चला असे सांगितले असता ट्रॅक्टर मालकाने तलाठी रोडगे यांना धक्काबुक्की केली. त्यांना पकडून ठेवले. व चालकास वाळूने भरलेले ट्रॅ्क्टर सुसाट वेगाने पळवून घेऊन जाण्यास सांगितले. या प्रकरणी तलाठी सुनील रोडगे यांच्या फिर्यादीवरून ट्रॅक्टर मालक आरेफ छोटू शेख (रा. औंढा ना.), ट्रॅक्टर चालकावर औंढा ना. पोलिस ठाण्यात १७ ऑगस्ट रोजी रात्री ११:५६ वाजता गुन्हा नोंद झाला. सहायक पोलिस निरीक्षक निरदोडे तपास करीत आहेत.