हिंगोली : बाबूराव कदम हा सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील, गोरगरिबांसाठी धावून जाणारा कार्यकर्ता आहे. आधीच्या मुख्यमंत्र्यांनी त्याला पैसे नसल्याने विधानसभा नाकारली होती. ते असते तर तुमच्याकडे पैसे किती? तुमचे काय? आमचे काय? विचारले असते. पण आम्ही फक्त काम करणाऱ्या सच्चा कार्यकर्त्याला संधी दिली, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे केले.
शिवसेनेचे उमेदवार बाबूराव कदम यांची उमेदवारी दाखल करण्यासाठी आल्यानंतर झालेल्या सभेत शिंदे बोलत होते. शिंदे म्हणाले, मागच्या वेळीही पैसे नसल्याने आधीच्या मुख्यमंत्र्यांनी कदम यांना विधानसभा नाकारली. मात्र जनतेने त्यांना ६१ हजार मते देवून सोबत असल्याचे दाखविले. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने आम्ही चालतो. आमच्या पक्षात राजा का बेटा राजा नाही तर जो काम करील तो राजा होईल, असे सांगितले. हेमंत पाटील यांनीच मला बाबूराव यांचे नाव सुचविले. त्यांना लोकसभेत पाठविण्याचे आवाहन केले. वाशिम -यवतमाळमध्ये राजश्री पाटील यांना उमेदवारी दिली. ती व हिंगोलीची जागा निवडून आणण्याचे आवाहन शिंदे यांनी केले.
या मंचावर आ.तान्हाजी मुटकुळे, आ.संतोष बांगर, आ.नामदेव ससाणे, आ. भीमराव केराम, माजी खा. शिवाजी माने, माजी आ.रामराव वडकुते, माजी आ. गजानन घुगे आदीची उपस्थिती होती. सभेनंतर मुख्यमंत्र्यांनी कदम यांची उमेदवारी भरण्यासाठी काढलेल्या रॅलीतही सहभाग नोंदविला.