कौठा ( जि. हिंगोली): मराठा समाजाला प्रथम आरक्षण द्यावे नंतरच शासनाचे कार्यक्रम गावात घ्यावेत. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही. तोपर्यंत गावात एकही शासकीय कार्यक्रम होऊ दिला जाणार नाही, असा इशारा देत ग्रामस्थांनी ' शासन आपल्या दारी' हा कार्यक्रम उधळून लावला. यावेळी 'एक मराठा लाख मराठा' अशी घोषणा देण्यात येत होती.
वसमत तालुक्यातील कौठा येथे आज सकाळी ११ वाजता 'शासन आपल्या दारी' हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. परंतु जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही. तोपर्यंत गावात एकही शासकीय कार्यक्रम घेतला जाऊ देणार नाही अशी भूमिका घेत ग्रामस्थांनी मंगळवारी शासनाचा हा उपक्रम उधळून लावला.
हा कार्यक्रम शासनाचा असून या कार्यक्रमात विविध शासकीय योजनांची माहिती ग्रामस्थांना देण्यात येणार आहे.तेव्हा आपण ग्रामस्थांनी सहकार्य करावे, असे आवाहन शासनाच्या वतीने कर्मचाऱ्यांनी केले. परंतु ग्रामस्थांनी या शासकीय कर्मचाऱ्यांचे म्हणणे न ऐकता 'एक मराठा लाख मराठा' अशी घोषणा देणे सुरू केले.यावेळी एकच गोंधळ निर्माण झाला होता.
यावेळी तलाठी शुभांगी जाधव, ग्रामसेवक डी के आजादे कृषी सहाय्यक नामदेव हंबर्डे , मुख्याध्यापक नारायण मुरमुरे, सरपंच मंगला तुंबे, आरोग्य सेवक प्रसन्नजीत दातार चे कर्मचारी उपस्थित होते. कौठा येथे या पूर्वीही विकसित भारत संकल्प यात्रा व ईव्हीएम मशीन प्रात्यक्षिक हे शासनाचे कार्यक्रमावर ग्रामस्थांनी बहिष्कार टाकून कार्यक्रम होऊ दिले नव्हते.