हिंगोली : अमरावतीहून नांदेडकडे निघालेल्या एसटी बसला वाशिम ते हिंगोली महामार्गावरील चिंचाळा पाटीजवळ अज्ञातांनी पेटवून दिल्याची घटना १० सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ च्या सुमारास घडली. या घटनेत बस पूर्णत: जळून खाक झाली असून, महामंडळाचे जवळपास २० लाख रूपयांवर नुकसान झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
अमरावतीहून रविवारी दुपारी ३ च्या सुमारास प्रवाशांना घेऊन एम.एच.२० जीसी ३८१३ (अमरावती- नांदेड) ही बस वाशिम ते हिंगोली महामार्गावरील चिंचाळा पाटीजवळ सायंकाळी ६:३० च्या सुमारास आली. या ठिकाणी बस पंक्चर झाल्याने चालक व वाहकांनी प्रवाशांना खाली उतरविले व पाठिमागून येणाऱ्या एका बसमध्ये प्रवाशांना बसवून दिले. त्यानंतर चालक गोपाल कोव्हळे व वाहक ज्ञानेश्वर सांगळे बसचे चाक बदलत असताना हिंगोलीकडून दुचाकीवर आलेल्या तिघा अज्ञातांनी बसवर पेट्रोल टाकून पेटवून दिली. यानंतर ते तिघेजण कनेरगाव नाकाच्या दिशेने सुसाट वेगाने निघून गेले.
काही क्षणात आग भडकली आणि बस पूर्णत: जळून खाक झाली. घटनेची माहिती कळताच कनेरगाव नाका चौकीचे पोलिस, गोरेगाव ठाण्याचे पोलिस निरिक्षक रवी हुंडेकर, हिंगोली ग्रामीण ठाण्याचे पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले होते. यादरम्यान हिंगोली येथून अग्निशमन दलास पाचारण करण्यात आल्यानंतर सुमारे अर्ध्या तासांनी आगीवर नियंत्रण मिळाले. परंतु, आगीत बस पूर्ण जळून खाक झाली असून, महामंडळाचे सुमारे २० लाख रूपयांचे नुकसान झाले. घटनास्थळी रात्री ८ वाजेच्या सुमारास हिंगोली आगाराचे वाहतूक निरीक्षक एफ.एम.शेख, सिद्धार्थ आझादे यांनी भेट देवून माहिती घेतली.