हिंगोली : हिंगोली, नांदेड, परभणी या तीन जिल्ह्यात शटर, घरफोडी करून धुमाकूळ घालणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पर्दापाश केला. यातील दोघांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून ४ लाखांचा मुद्देमाल जप्त केला.
वसमत शहरात जुलै व ऑगस्ट महिन्यात एकाच रात्री अनेक शटर फोडून चोरी झाल्याच्या घटना घडल्या होत्या. तसेच बंद घरेही फोडण्यात आली होती. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. चोरट्यांचा शोध घेण्याच्या सूचना पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पंडित कच्छवे, सहायक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे यांचे पथक चोरट्यांच्या मागावर होते.
वसमत येथील चोरीच्या घटनांत जोगींदरसिंग रणजितसिंग चव्हाण (रा. रेल्वेस्टेशन परिसर वसमत), सचिन देवेंद्र घलोत (रा. समीर नगर रेल्वेस्टेशन परिसर वसमत), दिपसिंग तिलपितीया (रा. शिवनगर नांदेड) यांचा समावेश असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यावरून पोलिसांनी जोगींदरसिंग चव्हाण व सचिन घलोत यांच्या घरी छापा मारून त्यांना ताब्यात घेतले. शटर, घरफोडीबाबत त्यांना विचारणा केली असता त्यांनी चोरी केल्याचे कबुल केले. पोलिसांनी त्यांच्याकडून ३.५ तोळे सोन्याचे व ६२ तोळे चांदीचे दागिणे, रोख २ हजार ८०० रूपये, दोन दुचाकी, रॉड, कात्री, बॅटरी असा एकूण ४ लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. यात दोन घरफोडी व एक शटर फोडीची घटना उघडकीस आली.
तीन जिल्ह्यात घरफोडीतिघांवरही परभणी, हिंगोली व नांदेड या तीन जिल्ह्यात शटर व घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. तिघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे पोलिसांनी सांगितले. ही कार्यवाही पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक पंडित कच्छवे, सहायक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे, पोलिस अंमलदार शेख बाबर, विठ्ठल कोळेकर, गणेश लेकुळे, आकाश टापरे, नरेंद्र साळवे, प्रशांत वाघमारे यांच्या पथकाने केली.