हिंगोली : सेनगाव तालुक्यातील वटकळी येथील महिला सरपंचाच्या पतीस अहिल्यादेवी सिंचन विहिरीच्या ठरावासाठी पाच हजारांची लाच घेताना २५ जानेवारी रोजी एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले. शेकूराव नारायण शिंदे (वय ७०) असे पैसे घेणाऱ्या सरपंच पतीचे नाव आहे.
वटकळी येथील तक्रारदार २५ वर्षीय युवकाच्या वडिलांच्या नावे अहिल्यादेवी सिंचन विहीर मग्रारोहयोत मंजूर करण्यासाठी ते पात्र लाभार्थी आहेत. त्यासाठीचा ठराव मंजूर करून देऊन विहिरीच्या पुढील कामासाठी सहकार्य करण्यासाठी शेकूराव शिंदे याने पाच हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. ती देण्याची तयारी नसल्याने याबाबत तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग गाठला. यावरून सापळा रचण्यात आला.
पाच हजारांची लाच घेताना शिंदे यास रंगेहाथ पकडले. यावरून सेनगाव पोलिसांत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. सापळा पथकात पोलिस निरीक्षक विनायक जाधव, प्रफुल्ल अंकुशकर, कर्मचारी शेख युनूस, विजय शुक्ला, ज्ञानेश्वर पंचलिंगे, गजानन पवार, राजाराम फुपाटे, भगवान मंडलिक, रवी वरणे आदींचा समावेश होता.