हिंगोली : येथील एसटी आगारात चालकाचा मृत्यू झाल्याची घटना ६ ऑक्टोबर रोजी ८ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. सुरेश सदाशीव सलामे (वय ५६, रा.राळेगाव जि.यवतमाळ, ह.मु.रिसाला बाजार, हिंगोली) असे मयत चालकाचे नाव आहे.
हिंगोली आगाराचे चालक सुरेश सदाशिव सलामे व वाहक गंगाधर कुऱ्हे हे ४ ऑक्टोबर रोजी हिंगोली ते सोलापूर या बसफेरीसाठी गेले होते. ५ ऑक्टोबरला सकाळी ते सोलापूरहून हिंगोलीकडे निघाले असता परभणी जिल्ह्यातील गंगाखेडनजीक चालक सुरेश सलामे यांना अचानक घाम आला आणि घबराहट होत होती. यावेळी त्यांनी एसटीबस थांबवून खासगी दवाखान्यात औषधोपचार घेतले. या दरम्यान सुमारे दोन तास आराम झाल्यानंतर सलामे यांची प्रकृती चांगली झाली. त्यानंतर त्यांनी रूग्णालयातून सुटी घेत परत बस घेऊन हिंगोलीकडे निघाले. रात्री १०:१५ च्या सुमारास ते हिंगोली बसस्थानकात आल्यानंतर एसटी बस डेपोत उभी केली. त्यानंतर चालक सलामे साहित्य घेण्यासाठी जुन्या विश्रामगृहाकडे गेले तर वाहक कुऱ्हे बसस्थानकातील नवीन विश्रामगृहात आरामासाठी गेले.
परंतु, ६ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ च्या सुमारास चालक सुरेश सलामे यांचा मृतदेह जुन्या विश्रामगृहात आढळून आला. आगार प्रमुख सूर्यकांत थोरबोले, वाहतूक निरीक्षक एफ.एम.शेख, मुकेश ठोंबरे, देशमुख यांनी विश्रामगृहाकडे धाव घेतली होती. त्यानंतर सलामे यांचा मृतदेह जिल्हा सामान्य रूग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात नोंद घेण्याची प्रक्रिया सुरू होती. दरम्यान, सलामे यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला असावा, असा प्राथमिक अंदाज लावण्यात येत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवदेहावर मुळगावी राळेगाव येथे अंत्यविधी होणार असल्याची माहिती आहे.