हिंगोली : अपघात झालेल्या कर्मचाऱ्याची वैद्यकीय रजा अर्जित रजेत परावर्तित करून ती मंजूर करून देण्यासाठी लाच स्वीकारणाऱ्या वन विभागातील कार्यालयीन अधीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.
८ ऑगस्ट रोजी दुपारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने वन विभागाच्या कार्यालयात ही कारवाई केली. यातील आरोपीचे नाव अरुण पवार असल्याचे सांगण्यात आले. वन विभागातील एका कर्मचाऱ्याचा अपघात झाल्यामुळे त्यांना वैद्यकीय रजेवर जावे लागले होते. ही वैद्यकीय रजा अर्जित रजेमध्ये परावर्तित करण्याची मागणी त्यांनी केली होती. मात्र त्यासाठी टाळाटाळ केली जात होती. शेवटी यात कार्यालयीन अधीक्षक अरुण पवार यांनी २२ हजार रुपयांची लाच दिल्यास ही प्रक्रिया पूर्ण करून देण्याची ग्वाही दिली. तर ही रक्कम देण्याची मागणी केली.
मात्र यापैकी १५ हजार रुपये आज देण्याचे ठरवून तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे कार्यालय गाठले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागानेही सापळा रचला. दुपारी दीड वाजेच्या सुमारास या सापळ्यात अरुण पवार अलगद अडकला. उपाधीक्षक अनिल कटके, पोलिस निरीक्षक प्रफुल्ल अंकुशकर, विनायक जाधव, जमादार तानाजी मुंडे, भगवान मंडलिक, गजानन पवार, राजेंद्र वरणे, राजाराम फुपाटे, ज्ञानेश्वर पंचलिंगे, शिवाजी वाघ, शेख अकबर यांच्या पथकाने ही कारवाई केली. ले. याप्रकरणी हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.