वसमत (हिंगोली) : तालुक्यातील वाखारी येथे पतीपत्नीने एकमेकांसोबत विहिरीत उडी घेत आत्महत्या केली. तोच विरेगाव येथे कालव्यात बुडुन पत्नीचा मृत्यू होताचं पतीने कालव्या शेजारील लिंबाच्या झाडाला दोरीने गळफास घेत आत्महत्या केली. या आत्महतेचे कारण कळू शकले नाही. दोन्ही घटने प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू हाेती. मात्र या दोन्ही घटनेने तालुका हादरला आहे.
वसमत तालुक्यातील वाखारी येथे १५ मे रविवार रोजी दुपारी २ वाजता स्वत:च्या शेतात शिवाजी गंगावळे वय २७, व त्यांची पत्नी शिवलीला शिवाजी गंगावळे वय २४, या दोंघानी एकमेकांसोबत विहिरीत उडी घेत आत्महत्या केली. नेमकी काेणत्या कारणाने आत्महत्या केली हे समजू शकले नाही. या दोघांचे २०२१ मध्ये लग्न झाले होते. या घटनेची माहिती मिळताचं, घटनास्थळी वसमत ग्रामीण पोलीस ठाण्याचे सपोनि विलास चवळी, आडे, अजय पंडित, अविनाश राठोड यांनी भेट देऊन पंचनामा केला. याप्रकरणी १९ मे गुरुवार रोजी पर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता.
विरेगावात पती-पतीची आत्महत्यादुसरी घटना : वसमत तालुक्यातील विरेगाव शिवारात असलेल्या कालव्यात १८ मे रोजी १२ वाजता वंदना नारायण उर्फ गुलाब लोखंडे वय ४०, यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेची माहिती पती नारायण उर्फ गुलाब लोखंडे वय ४७, यांना मिळताच त्यांनी कालव्याच्या शेजारील लिंबाच्या झाडाला दोरीने गळफास घेतला. या घटनेची माहिती हट्टा पोलिसांना मिळताचं, ठाण्याचे सतीष तावडे, ठाकुर, भूजंग कोकरे यांनी भेट देऊन पंचनामा केला. या प्रकरणी गुरुवारी सायंकाळपर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता. मयत यांच्या पाश्चात तीन मुले आहेत. यांच्याही आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही. तालुक्यातील दोन गावात पती-पत्नीने केलेल्या आत्महत्येची सर्वत्र चर्चा होती.