हिंगोली: शहरातील रामलीला मैदानावर आज घेण्यात येत असलेल्या ओबीसी समाजाच्या मराठवाडास्तरीय दुसऱ्या एल्गार महामेळाव्यासाठी मराठवाड्यासह राज्यभरातून समाजबांधव सहभागी झाले आहेत. या मेळाव्यात पारंपरिक अनेक समाजबांधव परंपरिक वेशभूषेत सहभाग नोंदविला आहे. या ठिकाणी समाजबांधवांनी हलगी वाजवित उपस्थितांचे लक्ष वेधले. यावेळी हलगीच्या तालावर अनेकांनी ठेकाही धरला होता.
ओबीसी समाजाच्या एल्गार महामेळाव्याची तयारी मागील आठवड्यापासून सुरू होती. रविवारी सकाळी ११ च्या सुमारास मेळावास्थळी शहरांसह ग्रामीण भागातून समाजबांधव दाखल होत होते. तर दुपारी १२ च्या सुमारास मैदानावर सर्वत्र गर्दी दिसून येत होती. यादरम्यान अनेक समाजबांधवांनी आपल्या पारंपरिक वेशभूषेत महामेळावास्थळ गाठले होते. बंजारा समाजातील महिला पारंपरिक वेशभूषा धारण करत सहभागी झाल्या होत्या. त्याच बरोबर भटक्या विमुक्त समाजातील बांधवांनीही आपापल्या पारंपरिक वेशभूषेत हजेरी लावली.