हिंगोली : शहराजवळील गारमाळ येथे नालीचे पाण्याच्या कारणावरून मारहाण केल्याची घटना १२ जून रोजी घडली. याप्रकरणी हिंगोली शहर पोलिस ठाण्यात १३ जून रोजी २६ जणांविरूद्ध गुन्हा नोंदविण्यात आला.
गारमाळ येथील इरशाद रशीद मुन्नीवाले यांचा नालीचे पाण्यावरून याच भागातील काही जणांसोबत १२ जून रोजी वाद झाला. या वादाचे पर्यावसान हाणामारीत झाले. यामध्ये इरशाद यांच्यासह त्यांच्या भावास शिवीगाळ करून मारहाण करण्यात आली. त्यावेळी भांडण सोडविण्यासाठी त्यांची आई, काका आले असता त्यांनाही मारहाण केली. या मारहाणीत काठ्या, तलवार, राॅड, कुऱ्हाडीचा वापर करण्यात आला. यामध्ये आठ ते दहा जण जखमी झाले असून, त्यांना हिंगोलीच्या शासकीय रूग्णालयात तर काहींना खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी गारमाळ गाठून परिस्थिती नियंत्रणात आणली.
याप्रकरणी इरशाद रशीद मुन्नीवाले यांच्या फिर्यादीवरून भिका बुरहाण दर्गीवाले, जुम्मा बुरहाण दर्गीवाले, चंदू बुरहान दर्गीवाले, छोटू बुरहान दर्गीवाले, रमजान बुरहाण दर्गीवाले, बाबू दर्गीवाले, रन्नू दर्गीवाले, सलीम भिका दर्गीवाले, जावेद भिका दर्गीवाले, रहीम भिका दर्गीवाले, अनिस भिका दर्गीवाले, अन्सार भिका दर्गीवाले, अफजल रमजान दर्गीवाले, हुसेन रमजान दर्गीवाले, अजिम जुम्मा दर्गीवाले, आसिफ जुम्मा दर्गीवाले, अजीस चंदू दर्गीवाले, इस्माईल चंदू दर्गीवाले, शाहरूक छटू दर्गीवाले, हकीम छटू दर्गीवाले, आयूब चंदू दर्गीवाले, अकिल छटू दर्गीवाले, बिलाल बाबू दर्गीवाले, वसीम बाबू दर्गीवाले, अकबर सलीम दर्गीवाले, अतीक सलीम दर्गीवाले (सर्व रा.गारमाळ) यांच्या विरूद्ध हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी मारोती थोरात, पोलिस निरीक्षक पाडळकर, वडकुते यांनी भेट दिली. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक मोरे करीत आहेत.