हिंगोली : तालुक्यातील जोडतळा येथील ग्रामपंचायतीने १५ व्या वित्त आयोगाच्या निधीचा गैरव्यवहार केला असून याच्या चौकशीसाठी एकाने ग्रामपंचायत कार्यालयासमोरच गळ्यापर्यंत गाडून घेत आंदोलन केले.
जोडतळा येथील ग्रामपंचायतीमध्ये १५ व्या वित्त आयोगाच्या निधीची चौकशी करण्याची करण्याची मागणी नारायण जाधव यांनी २४ मे २०२४ रोजी केली होती. तर गावातील पाणंद रस्त्याचे कामही दर्जाहीन झाल्याचा आरोप करीत ३१ मे रोजी निवेदन दिले होते. सरपंच निर्मला डोंगरदिवे व ग्रामसेविका चक्रावार यांच्यावरही त्यांनी गावातील गावठाण जागा बेकायदेशीररीत्या नमुना क्रमांक आठला लावल्याचा आरोप केला आहे. याचीही चौकशी करण्याची मागणी होती.
एप्रिल महिन्यात आचारसंहितेचे कारण पुढे करून मासिक सभाही घेण्यात आली नाही. तर वरिष्ठ प्रशासन याची चौकशी न करता एकप्रकारे याचे समर्थन करीत असल्याचा आरोप केला. चौकशी न झाल्यास २० जून रोजी जोडतळा ग्रामपंचायतसमोर अर्ध गाडून घेवून आंदोलन करण्याचा इशारा जाधव यांनी दिला होता. मात्र अजूनही कोणतीच चौकशी न झाल्याने अखेर त्यांनी हे आंदोलन सुरू केले आहे. जोपर्यंत ठोस निर्णय हाती येत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशाराही त्यांनी दिला.आंदोलनस्थळी बघ्यांची गर्दी होत होती.