- विश्वास साळुंके वारंगा फाटा (जि. हिंगोली) - दाभडी ग्रामपंचायतअंतर्गत महालिंगी येथे मागील चार महिन्यांपासून पिण्याचे पाणी मिळत नाही. त्यामुळे ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी तब्बल चार किलोमीटरपर्यंत भटकंती करावी लागत आहे. वेळोवेळी सांगूनही लक्ष न दिल्याने अखेर ग्रामस्थांनी २५ मार्च रोजी ग्रामपंचायतवर घागर मोर्चा काढला.
कळमनुरी तालुक्यातील दाभडी ग्रामपंचायतअंतर्गत महालिंगी येथे मागील चार महिन्यांपासून पिण्याचे पाणी मिळत नाही. परिणामी ग्रामस्थांना जवळपास पाच किलोमीटर अंतरापर्यंत पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. वेळोवेळी संबंधित विभाग, अधिकारी व कर्मचाऱ्यांना सांगूनही कोणी लक्ष दिले नाही. त्यामुळे शेवटी ग्रामस्थांनी २५ मार्च रोजी ग्रामपंचायतवर घागरमोर्चा काढला.
गावातील सर्व महिला,पुरुष हे पाण्याची भांडी घेऊन ग्रामपंचायतसमोर सकाळी ते दोन वाजेपर्यंत उन्हात ठाण मांडून बसले होते. यापूर्वी जिल्हा प्रशासनाला ग्रामस्थांनी घागर मोर्चा व उपोषणा संदर्भात २४ मार्च रोजी निवेदन दिले होते. ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असून प्रचंड पाणी टंचाईचा सामना करावा लागत असल्या बाबत म्हटले होते. तसेच सदरील बाब अनेकवेळा गटविकास अधिकारी कळमनुरी यांच्या निदर्शनास आणून देखील त्यांनी कुठल्याही प्रकारची उपाययोजना केली नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
पाण्याची तात्पुरती व्यवस्था केली... ग्रामपंचायतवर घागर मोर्चा काढल्यानंतर अखेर गटविकास अधिकाऱ्यांनी तात्काळ ग्रामस्थांसाठी तात्पुरती टँकरची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. लवकरच ग्रामस्थांना पाणीपुरवठा सुरळीत चालू होईल, असे आश्वासन गटविकास अधिकाऱ्यांनी दिल्याचे ग्रामस्थ गुणाजी चाकोते यांनी सांगितले. जर नळाद्वारे किंवा टँकरद्वारे पाणी सुरळीत नाही मिळाले तर ग्रामपंचायतीसमोरच उपोषण करणार असल्याचेही चाकोते यांनी सांगितले.