कुरुंदा ( हिंगोली ) : गत तीन दिवसांपासून पावसाने कहर केला आहे. ९ जुलै रोजी आसना नदीचे पाणी एसबीआय बँक व सहकारी पतसंस्थेच्या तिजोरीपर्यंत गेले होते. यामुळे जवळपास १२ लाख २२ हजार रुपये भिजल्याचे बँक अधिकाऱ्यांनी सांगितले.
९ जुलैपासून कुरुंदा व परिसरात पावसाची रिपरिप सुरूच आहे. ९ जुलै रोजी आसना नदीच्या पुराचे पाणी कुरुंदा गावातील एसबीआय बँक व सहकारी पतसंस्थेच्या तिजोरीपर्यंत गेले. त्यामुळे त्यात १२ लाख २२ हजार रुपये पुराच्या पाण्याने भिजल्याचे मंगळवारी सांगण्यात आले. कुरुंदा येथे ९ जुलैला झालेल्या अतिवृष्टीमुळे गावात महापूर आला. यावेळी पुराचे पाणी एसबीआय, जगद्गुरू पतसंस्था आणि शिवेश्वर सहकारी बँकेच्या तिजोरीपर्यंत पोहोचले होते. मंगळवारी बँकेच्या अधिकाऱ्यांनी पैसे भिजल्याची माहिती दिली. पुराच्या पाण्याने एसबीआय बँकेचे कागदपत्र व संगणक भिजले, शिवेश्वर बँकेचे संगणक, २२ हजार रुपये, जगद्गुरू पतसंस्थेचे १२ लाख रुपये भिजल्याचे संबंधितांनी सांगितले.
पूरबाधितांच्या मदतीला धावले आरोग्य कर्मचारीवसमत तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे आसना नदीकाठावरील गावांमध्ये पाणी शिरले होते. यात अनेक शेतकऱ्यांचे पशुधन वाहून गेले आहे. प्रशासनाने तत्काळ पूरबाधित गावांना भेट देत आढावा घेतला, तसेच आवश्यक असलेली मदत देण्याचा प्रयत्न केला. आरोग्य विभागाचे पथकही तत्काळ दाखल झाले. तेथील पूरपरिस्थितीची पाहणी करून ग्रामस्थांना औषधोपचार उपलब्ध करून दिले. प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत सर्व कर्मचाऱ्यांमार्फत सर्वेक्षण करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. तसेच पिण्याच्या पाण्यामध्ये ब्लिचिंग पावडर टाकून नियमित शुद्धीकरण करण्याबाबत ग्रामपंचायतीला कळविले आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत ओटी टेस्ट, साथरोगाबाबत सर्वेक्षण करण्यात आले. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर, सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. गणेश जोगदंड, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदीप काळे आदी उपस्थित होते.