औंढा नागनाथ : शहरातील नागनाथ मंदिर परिसरातील हरिहर तलावाजवळून जाणाऱ्या एक्स्प्रेस लाइनच्या विद्युत तारा गुरुवारी दुपारी साडेबारा वाजता अचानक तुटल्या. रस्त्यावर पडल्यानंतर तारांची स्पार्किंग झाली. मोठा आवाज होत रस्त्यावर ठिणग्या पडू लागल्या. यावेळी रस्त्यावर कोणी नसल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेत कोणालाही जीवितहानी झाली नाही.
औंढा नागनाथ ज्योतिर्लिंग नागनाथ मंदिरात सदर एक्स्प्रेस लाइन दिलेली आहे. अचानक तारा तुटल्या व फटाका फुटावा असा आवाज होऊन रस्त्याने पेट घेतला. या दरम्यान, रस्त्यावर कोणी नसल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. नगरसेवक मनोज देशमुख यांनी तत्काळ महावितरण कार्यालयात फोन करून घडलेल्या घटनेबद्दल माहिती दिली. यानंतर ताबडतोब विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला.जवळच आठवे ज्योतिर्लिंग नागनाथाचे मंदिर आहे. तर गुरुवार हा बाजाराचा दिवस असल्याने या भागात मोठी वर्दळ होती. परंतु, तार तुटला त्यावेळी सुदैवाने कोणी ताराखाली नसल्याने मोठी दुर्घटना टळली. रस्त्याने पेट घेतल्याने दोन दोन फूट खोल खड्डे पडले. यानंतर बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. मंदिर न्यायालयासह महत्त्वाच्या कार्यालयात ही एक्स्प्रेस लाइन आहे.
घटना घडल्यानंतर मोठी गर्दी झाली...तार तुटल्याचा प्रकार घडताच या ठिकाणी मोठी गर्दी झाली. या लाइनमध्ये २४ तास विद्युत पुरवठा असतो. परंतु, या लाइनच्या ताराखाली तार तुटल्यास अडकण्यासाठी सेक्युरिटी नाही. त्यामुळे तार सरळ खाली रस्त्यावर पडला. तार पडताच रस्त्याने पेट घेतला. येथे असलेल्या नागरिकांनी ही घटना मोबाइलमध्ये कैद केली आहे.