हिंगोली : सेनगाव तालुक्यातील कोळसा शिवारातील आखाड्यावरील शेळ्यांवर लांडग्याने हल्ला केल्याची घटना १७ जुलै रोजी सकाळी उघडकीस आली. या हल्ल्यात आठ शेळ्या ठार झाल्या असून शेतकरी संतोष कदम यांचे सुमारे एक ते दीड लाखांवर नुकसान झाले आहे.
कोळसा येथील शेतकरी संतोष सिताराम कदम हे शेतीसह शेळीपालन व्यवसाय करतात. १६ जुलै रोजी दिवसभर शेतशिवारात शेळ्या चारल्या आणि सायंकाळच्या सुमारास त्यांनी शेतात असलेल्या आखाड्यावर कोंडल्या होत्या. रात्रीला लांडग्याने या शेळ्यांवर हल्ला केला. या हल्ल्यात आठ शेळ्या मृत्यूमुखी पडल्या. १७ जुलै रोजी सकाळी ही घटना उघडकीस आली. घटनेची माहिती महसूल प्रशासनाला देण्यात आल्यानंतर पंचनामा करण्यात आला. या घटनेत एक ते दीड लाख रूपयांवर नुकसान झाल्याचे कदम यांनी सांगितले.
दरम्यान, कोळसा शिवारात वन्य प्राण्यांचा वावर वाढला असून, यामुळे शेतकऱ्यांत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन विभागाने या भागातील वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.