लोकमत न्यूज नेटवर्ककुरूंदा : औंढा नागनाथ तालुक्यातील शिरडशहापूर येथे मंगळवारी चार ठिकाणी चोरीच्या घटना घडल्या असून एका मोबाईल दुकानातून ५४ मोबाईल तर एका दुकानातून ३० हजारांची रोकड, १८ हळदीचे कट्टे असे १ लाख ८२ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. या घटनेमुळे शिरडशहापूर येथे खळबळ उडाली आहे.येथील मुख्य रस्त्यावरील गुंजन मोबाईल शॉपीचे रात्री ३ वाजण्याच्या सुमारास शटर वाकवून दुकानातील जवळपास ९३ हजार ९०० रुपयांचे ५४ मोबाईल चोरले आहे. त्यानंतर चोरट्यांनी नवनाथ कोरडे यांच्या दुकानचे शटर वाकवून दुकानातील हळदीचे १८ कट्टे, १० क्विंटल ५९०० रुपयांचा माल लंपास केला. कोंडबा अंभोरे यांचे भुसार दुकानाचे शटर वाकवून चोरटे आत शिरले; परंतु त्यांच्या हाती काहीच लागले नसल्याने चोरट्यांनी त्यांचा मोर्चा कैलास पारधे यांच्या दुकानाकडे वळवून त्यांच्या दुकानातील नगदी ३० हजार रुपये चोरून नेले. एकूण १ लाख ८२ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी एकाच रात्री लंपास केला. घटनास्थळी डीवायएसपी देशमुख, सपोनि शंकर वाघमोडे, फौजदार नेटके, गुन्हे अन्वेषण विभागाचे फौजदार लंबे आदींनी भेट देऊन घटनेचा पंचनामा केला आहे. घटनास्थळी श्वानपथकास पाचारण करण्यात आलेले होते. त्यातून काहीच निष्पन्न झाले नाही. ठसे तज्ज्ञ अधिकारी नमुने तपासाकामी घेतले आहेत. फिर्यादी सुनील उभे यांच्या तक्रारीवरून कुरूंदा पो. ठाण्यात अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिरड येथे एकाच रात्री चार ठिकाणी चोरींच्या घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2019 11:58 PM