विश्वास साळुंके, वारंगा फाटा (जि. हिंगोली) : घराच्या मुख्य गेटचे कुलूप तोडून घरात प्रवेश करीत चोरट्यांनी कपाटातील रोख रक्कम, सोने, चांदीचे दागिणे असा एकूण २ लाख ८ हजारांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. ही घटना कळमनुरी तालुक्यातील दांडेगाव येथे ७ एप्रिल रोजी पहाटे ४.३० वाजेच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.
कळमनुरी तालुक्यातील दांडेगाव येथील नितीन गणेशराव साळुंके कुटूंबीय जेवण करून गुरूवारी रात्री ११.३० च्या सुमारास झोपी गेले होते. दुसऱ्या दिवशी पहाटे ४.३० वाजता नितीन साळुंके यांना जाग आली. यावेळी त्यांना घराचा दरवाजा उघडा दिसला. घराच्या मेन गेटचे कुलूप तोडल्याचेही दिसले. त्यामुळे घरी चोरी झाल्याचे स्पष्ट झाले. त्यांनी घरात पाहणी केली असता कपाटातील ४५ हजारांचे सोन्याचे दीड तोळ्याचे गळ्यातील लॉकेट, ३० हजारांच्या एक तोळ्याच्या दोन अंगठ्या, ३० हजारांचे कानातील डोरले व वेली, ३० हजारांची बदामी अंगठी, १५ हजारांचा ओम,३ हजारांचे सोन्याचे मनी, ३० हजारांची सोन्याची सहा ग्रॅमची आंगठी तसेच रोख २५ हजार रूपये असा एकूण २ लाख ८ हजारांचा ऐवज चोरट्यांनी लपास केल्याचे स्पष्ट झाले.
त्यामुळे त्यांनी आखाडा बाळापूर पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच सहायक पोलिस निरीक्षक पंढरीनाथ बोधनापोड यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. याप्रकरणी नितीन गणेशराव साळुंके यांच्या फिर्यादीवरून चोरट्यांविरूद्ध आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. पोलिस उपनिरीक्षक वाघमारे तपास करीत आहेत.
ग्रामस्थांनी दक्षता घ्यावीदरम्यान, आखाडा बाळापूर पोलिस ठाण्याचे पथक परिसरात रात्री गस्त घालते. तरीही ग्रामस्थांनीही दक्ष राहून गावात चोरटे शिरणार नाहीत, याची काळजी घ्यावी. चोरी सारख्या घटनांना आळा घालण्यासाठी युवकांनी रात्रीला गस्त घालावी, असे आवाहन सहायक पोलिस निरीक्षक बोधनापोड यांनी केले आहे.