हिंगोली : 'नारायण राणेंना मला संदेश देयचा आहे. कुठे येयचे कुठे येयचे ते तुम्ही काय सांगता, तुमच्या घरामध्ये एकट्याने घुसून चारीमुंड्या चित्त करेल, पोलीस प्रोटेक्शन बाजूला केले तर कोथळा बाहेर काढण्याची ताकद आमच्यात आहे', असे प्रक्षोभक विधान शिवसेना आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांनी मंगळवारी आंदोलनात हिंगोली येथे केले. शिवसेना- भाजप यांच्यातील संघर्षाने राज्यातलं वातावरण चांगलेच तापलेले असताना आमदार बांगर यांनी नारायण राणे ( Narayan Rane ) यांना थेट मारण्याची धमकी दिल्यामुळे नवा वाद उद्भवण्याची शक्यता आहे. ( '... then let's break into the house and take out Narayan Rane's life'; Shiv Sena MLA Santosh Bangar's provocative statement )
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे मुख्यमंत्र्यांबद्दलच्या आक्षेपार्ह वक्तव्यावरून राज्यभर आगडोंब उसळला आहे. यातच दोन्ही बाजूंच्या नेत्यांच्या जहरी टीकेने शिवसेना - भाजप यांच्यातील संघर्षाचा नवा अंक यामुळे सुरु झाला. दरम्यान, हिंगोलीत शिवसेना आमदार संतोष बांगर यांच्या नेतृत्वात मंगळवारी महात्मा गांधी चौकात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून त्यांच्या छायाचित्राला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. यावेळी आ. बांगर यांनी राणेंच्या विरोधात अत्यंत प्रक्षोभक व्यक्तव्य करत घरात घुसून कोथळा बाहेर काढण्याचे खुले आव्हान दिले. राणेंचा एकेरी उल्लेख करत बांगर म्हणाले, 'नारायण राणेंना मला संदेश द्यायचा आहे, तू काय सांगतो कुठे यायचं कुठे यायंच. तुझ्या घरात घुसून मारण्याची ताकद आमच्यामध्ये आहे. माझं पोलिस प्रोटेक्शन जरा बाजूला कर, हा संतोष बांगर, शिवसेनेचा मावळा, छत्रपतींचा मावळा एकटा येऊन जर तुला चारीमुंड्याचीत नाही केलं, तुझा कोथळा जर बाहेर नाही काढला, तर संतोष बांगर नावं सांगणार नाही.'
दरम्यान, राज्यात आधीच शिवसेना -भाजप संघर्ष तीव्र झालेला आहे. यात नारायण राणेंच्या घरात घुसून कोथळा बाहेर काढतो अशी थेट धमकी शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी दिली. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेतील संघर्ष अधिक चिघळण्याची शक्यता आहे.