हिंगोली : शहरात पाण्याची पातळी चांगली असली तरी नागरिकांना २०० ते २५० फुटांपर्यंत बोअर घ्यावा लागत आहे. पाण्याचा अपव्यय टाळला नाही, तर भविष्यात पेट्रोलपेक्षाही पाणी महाग होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
२०११ च्या जनगणनेनुसार हिंगोली शहराची लोकसंख्या ८५ हजार १०३ एवढी आहे. आजमितीस त्यात वाढ होऊन ती १ लाख २५ हजार एवढी झाली आहे. शहराच्या आसपास नवीन वस्तीतही मोठ्या प्रमाणात भर पडल्याचे पाहावयास मिळत आहे. सद्य:स्थितीत शहरात एकूण बोअरवेल १२ हजार जवळपास आहेत. आजमितीस प्रतिव्यक्ती १३५ एलपीडी पाणी लागते. तिरुपतीनगर, नाईकनगर, जिजामातानगर, गंगानगर या भागाचा नवीन वस्तीत समावेश केला जातो.
नगर परिषदेच्या वतीने नळधारकांना वेळोवेळी पाणी जपून वापरा, पाण्याचा अपव्यय टाळा, अशा सूचना दिल्या जातात; परंतु काही नळधारक नगर परिषदेच्या सूचनांकडे लक्ष न देता पाणी जपून वापरत नाहीत. त्यामुळे पाण्याचा अपव्यय होतो आहे. पर्ययाने पाण्यासाठी ओरड निर्माण होते. आजमितीस नगर परिषदेच्या वतीने दोन दिवसांआड पाणी दिले जाते. पाणी जपून वापरावे, असे आवाहनही नगर परिषदेने वारंवार केले आहे.
सर्वच ठिकाणी दोन दिवसांआड पाणी...
पाण्याच्या बाबतीत कोणताही दुजाभाव केला जात नाही. मागील कित्येक महिन्यांपासून शहरातील नळधारकांना दोन दिवसांआड पाणी दिले जात आहे. पाण्याचा अपव्यय होऊ नये म्हणून नळधारकांनी नळाला तोट्या बसविणे गरजेचे आहे. यात काहींनी नळांना तोट्या लावल्या आहेत, तर काहींनी नळांना तोट्या सांगूनही लावल्या नाहीत.
नळासाठी केला जातो खड्डा
शहरातील जुन्या व नवीन वस्त्यांमध्ये नळासाठी खड्डा केला जातो. त्या नळाला तोटीसुद्धा नसते. अशावेळी सकाळी सोडलेले पाणी वाया जाते. बहुतांश वेळा खड्डा पाण्याने भरल्यानंतरच नळधारकांच्या लक्षात येते. नळांना तोट्या बसवाव्यात, अशी सूचना नगर परिषदेने वारंवार केली आहे; परंतु नळधारकांच्या कसे लक्षात येत नाही? हा यक्ष प्रश्न आहे.
नवीन वस्तीत जास्त बोअरवेल
शहराचा जुना भाग सोडला, तर शहराच्या आसपास असलेल्या नवीन वस्तीत जास्त प्रमाणात बोअर घेतले आहेत. आजमितीस २०० ते २५० फुटांवर पाणी लागते. काही जण ३०० फुटांच्या जवळपास बोअरवेलची खोली घेतात. भविष्यात पाण्याचा अपव्यय टाळला नाही, तर पेट्रोलपेक्षाही पाणी महाग होईल, असे जाणकारांचे म्हणणे आहे.
२ दिवसांआड शहराला पाणीपुरवठा
शहरातील एकूण बोअरवेल ६७५
शहराची एकूण लोकसंख्य १ लाख २५ हजार
प्रति व्यक्ती मिळते पाणी १३५ (एलपीडी)
जलपुनर्भरण नावालाच...
शासनाने जलपुनर्भरणाबाबत जनजागृती करणे गरजेचे आहे. नागरिकांना अजूनही जलपुनर्भरणाबाबत माहिती नाही. रोजच्या रोजच शहरात पाण्याचा अपव्यय होत आहे. यासाठी काहीतरी उपायोजना व्हायला पाहिजेत.
-मुरलीधर कल्याणकर, नागरिक
शहरातील जुनी वस्ती व नवीन वस्ती भागात मागील काही महिन्यांपासून पाण्याचा अपव्यय होत आहे. नगर परिषदेचे याकडे अजिबात लक्ष नाही. पुनर्भरण कार्यक्रम हा नावालाच आहे, असे म्हटल्यास ते वावगे ठरणार नाही.
-ॲड. शिवराज सरनाईक, नागरिक