हिंगोली: सर्व पक्षांनी एकत्र येऊन मराठा समाजाला आरक्षण देऊन गोरगरीब मराठा समाजाचे ऋण फेडावे. दुसरे म्हणजे मराठा समाज आरक्षण मिळाल्याशिवाय गप्प बसणार नाही. सरकारच्या म्हणण्यानुसार वेळ दिला आहे. तेंव्हा सरकारने विलंब न लावता मराठा समाजाला तातडीने सरसकट आरक्षण द्यावे, असे आवाहन मनोज जरांगे - पाटील यांनी केले.
२ ऑक्टोबर रोजी वसमत तालुक्यातील कुरुंदा येथे मराठा आरक्षण ‘एल्गार सभा’ आयोजित करण्यात आली होती. सदरील सभेत जिल्हाभरातून सकल मराठा समाज आला होता. यावेळी मनोज जरांगे - पाटील यांचा समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला. जरांगे - पाटील म्हणाले, उपोषणादरम्यान सरकारने वेळ मागितला. त्यामुळे ४० दिवसांचा वेळ दिला आहे. आता मराठा समाज थांबणार नाही. आरक्षण घेतल्याशिवाय माघार घेणार नाही. मराठा समाजाला आरक्षण पाहिजे, ते आम्ही मिळवून घेणारच आहोत.
आंदोलन करा; पण शांततेने...मराठा समाजाचे आंदोलन सुरूच राहणार आहे. मराठा समाजाने एक करायचे ते म्हणजे आंदोलन शांततेच्या मार्गाने आंदोलन करा. कुठेही उद्रेक होता कामा नये. उद्रेक केला तर सरकारला बोलायला वाव मिळणार आहे. आता हा आरक्षणाचा अंतिम टप्पा राहणार आहे. १४ ऑक्टोबर रोजी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे सभेला येण्याचे आवाहनही यावेळी जरांगे - पाटील यांनी केले.