लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : लोकसभा निवडणुकीला अवघा सहा महिन्यांचा काळ उरल्याने आता सर्वच पक्षांत नवे इच्छुकही डोके वर काढू लागले आहेत. आतापर्यंत ज्या इच्छुकांच्या नावाची चर्चा होती. त्यापैकी अनेकजण आधीच गारद झाल्याची चिन्हे दिसू लागली आहेत.लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर आता पक्ष पातळीवर तयारी सुरू झाल्याचे चित्र आहे. काँग्रेसचे विद्यमान खा.राजीव सातव हा एक चेहरा समोर आहे. मात्र त्यांच्यासमोर कोण राहणार? याची निश्चिती काही होत नाही. या पक्षाचे उत्तर भाजप, सेना या दोन्ही पक्षांना सापडले नसल्याचे दिसत आहे. इच्छुकांच्या रांगा लावून ठेवल्या. मात्र आपल्यालाच उमेदवारी मिळेल याची काय खात्री असा विचार करून तेही आता थंड पडल्याचे दिसत आहे. काही दिवसांपूर्वी काही जणांनी मतदारसंघात चाचपणी करून पाहिली. त्याचे निष्कर्ष काय आले? त्यांनाच माहिती. त्यानंतर ही मंडळी त्यादृष्टिने कोणतेच कार्य करताना दिसत नाही. शिवसेनेलाच ही जागा पुन्हा सोडली जाईल, असे विश्वासाने सांगितले जाते. यात माजी मंत्री जयप्रकाश मुंदडा यांना मैदानात उतरविले जाण्याची शक्यता आहे. त्यांनी चाचपणीही केली. मात्र आता नांदेड दक्षिणचे आ.हेमंत पाटील यांच्या नावाचीही चर्चा रंगू लागली आहे. दिग्गज उमेदवार रिंगणात आणण्यासाठी सेनेकडून प्रयत्न असल्याचे सांगितले जाते. कदाचित यामुळे यापूर्वी प्रयत्न करणारी मंडळी अचानक गायब झाली. भाजपकडूनही या जागेवर दावा सांगितला जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सूर्यकांता पाटील, अॅड.शिवाजी माने व सुभाष वानखेडे या दिग्गजांनी या जागेसाठीच भाजपचा उंबरा चढला होता. यापैकी माने यांनीही काही काळ फेऱ्या मारल्या. इतर दोघांची कोणतीच तयारी दिसत नाही. आता भाजप हिंगोलीत मतदारसंघात येणाºया तीन जिल्ह्यांतील पदाधिकाºयांचा वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत मेळावा घेणार आहे. या पार्श्वभूमिवर हिंगोलीचे नगराध्यक्ष बाबाराव बांगर हेही लोकसभेच्या रिंगणात उतरण्यास तयार असल्याचे समोर येत आहेत. विधानसभेसाठी इच्छा व्यक्त करणारे बांगर यांनी अचानकच लोकसभेची कास धरली आहे. त्यामुळे जशी निवडणूक जवळ येत आहे, तसा नव्या इच्छुकांचा चेहरा समोर येत आहे.निवडणूक येईपर्यंत अनेकांची नावे समोर येतीलही. मात्र ज्याला खरोखरच तयारी करायची आहे, त्याने आतापासूनच कामाला लागणेही तेवढेच अपरिहार्य आहे. नेमका याच बाबीचा अभाव दिसत आहे. तर दुसरीकडे खा.राजीव सातव निवडणूक लढवायची की नाही, हे पक्ष ठरवणार हे सांगत असले तरीही पायाला भिंगरी बांधून फिरू लागले आहेत. त्यांना टक्कर द्यायची तर विरोधकांना गाफिल राहून चालणार नाही.
लोकसभा इच्छुकांत पडतेय भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2018 12:35 AM