सेनगाव : जिल्हात वाळू घाटांची लिलाव प्रक्रिया सुरू झाली आहे. परंतु या लिलावात सेनगाव तालुक्यातील एकही वाळू घाट नसल्याने तालुक्यातील वाळू टंचाई कायम राहण्याची चिन्ह दिसत आहेत. त्याचा मोठा परिमाण बांधकाम क्षेत्रावर होणार असून अनेक घरकुल लाभार्थ्यांची बांधकाम वाळू अभावी रखडली आहेत.
सेनगाव तालुक्यातून पुर्णा, पैनगंगा, कयाधू हा प्रमुख नद्या वाहतात. त्यातील पुर्णा व पैनगंगा नदी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाळू साठा आहे. या तिन्ही नद्यामध्ये एकुण १७ वाळू घाट आहेत. परंतु मागील तीन वर्षांपासून विविध कारणांमुळे यापैकी एकही वाळू घाट लिलावात निघाला नाही. त्यामुळे त्याचा परिमाण बांधकाम क्षेत्र, तसेच विविध विकास कामावर हाेत आहे. बाहेर राज्यातून आलेल्या वाळू किवा दगडाच्या वाळूचा उपयोग करून बांधकामे केली जात आहेत. ती कामे दर्जेदार होत नसून अधिक खर्चीक असल्याने सर्वसामान्य अडचणीत आहेत. अशा स्थितीत किमान यावर्षी तरी तालुक्यातील प्रमुख वाळू घाट लिलावात निघतील अशी अपेक्षा होती. परंतु पर्यावरण विभागाने तालुक्यातील सर्वचा सर्व १७ वाळू घाटाला परवानगी नाकारली असल्याने जिल्ह्यातील वाळू घाट लिलाव प्रक्रियेमध्ये पहिल्या टप्यात तालुक्यातील एकही घाट नाही. त्यामुळे यावर्षी मुबलक पाणी असून वाळू टंचाईचे संकट कायम असल्याने वाळू करीता मोठी किंमत मोजावी लागणार आहेत.