हिंगोली : भंडाऱ्यातील नवजात शिशू अतिदक्षता विभागातील आगीच्या घटनेनंतर हिंगोली जिल्हा सामान्य रुग्णालयाने इलेक्ट्रिक व स्ट्रक्चरल ऑडिट प्रस्तावित केले असून, ही इमारत फार जुनी नसल्याने तेवढ्या समस्या नसल्या, तरीही दर दोन वर्षांनी या तपासण्या होणे गरजेचे आहे. फायर कंट्राेल युनिट मात्र ५१ बसविले असून, त्यांची अजून दोन वर्षांची मुदत शिल्लक आहे.
हिंगोली जिल्हा सामान्य रुग्णालयाची इमारत ही १५ ते १६ वर्षांपूर्वीची असल्याने या रुग्णालयात इलेक्ट्रिकविषयी समस्या त्या प्रमाणात नाहीत. तरीही काही ठिकाणी वायरिंग उघड्यावर असून, अनेक ठिकाणी बटने, फॅन बंद आहेत. त्याचबरोबर काही ठिकाणी वायरिंगवर मोठ्या प्रमाणात जळमटे चढली असून, त्याखाली काय परिस्थिती आहे, हे कळायला मार्ग नाही. इतरत्र हे चित्र असताना विशेष नवजात शिशू अतिदक्षता कक्षात मात्र त्यामानाने अतिशय चांगले चित्र आहे. डाॅक्टर व स्टाफही कायम हजर राहतो. केवळ या कक्षातील काही फरशा गळून पडल्या आहेत. हा कक्षही आता स्थलांतरित केला जाणार आहे.
पाहणीत काय आढळले ?
जिल्हा सामान्य रुग्णालयातील जुन्या भागात काही ठिकाणी वायरिंगची अडचण आहे तर नव्या भागात सर्वच नवीन आहे. त्यामुळे तेवढा गंभीर प्रकार दिसून येत नाही. तरीही काही ठिकाणी उघडी असलेली वायरिंग, बंद पडलेले स्विच या अडचणी दूर कराव्या लागतील. आपत्कालिन स्थितीत अडचण येणार नाही, यासाठी नवे दरवाजे काही ठिकाणी टाकावे लागतील.
ऑडिट न करण्याला जबाबदार कोण ?
जिल्हा रुग्णालयात ऑडिट करणारी यंत्रणा नाही. मात्र, त्यांनी यासाठी पत्रव्यवहार करणे अपेक्षित आहे. स्थानिक अग्निशमनने फायर ऑडिट तर बांधकाम विभागाने स्ट्रक्चरल ऑडिट करणे अपेक्षित असते. मात्र, विभागावर जबाबदारी ढकलून एकमेकांकडे बोट दाखवले जाते.
सुरक्षिततेबाबत रुग्णालय प्रशासन सजग
आपल्या जिल्हा रुग्णालयाची इमारत फार जुनी नाही. त्यामुळे इलेक्ट्रिक, स्ट्रक्चरल ऑडिट करावे, असे चित्र नाही. तरीही नियमितपणे विद्युतविषयक दुरुस्ती केली जाते. जेथे जास्त वीज क्षमतेची उपकरणे अथवा संवेदनशील उपकरणे आहेत, तेथे अधिक काळजी घेतली जाते. तर आता ऑडिटही प्रस्तावित केले आहे.
- डाॅ. राजेंद्र सूर्यवंशी,
जिल्हा शल्य चिकित्सक
रूग्ण रूग्णालयात स्वत:ला किती सुरक्षित समजतात?
मला जुळी अपत्यप्राप्ती झाली. एक मुलगा व एक मुलगी आहे. त्यांच्यात अशक्तपणा असल्याने त्यांना अतिदक्षता विभागात भरती केले आहे. मुलीला सात दिवसांपासून तर मुलाला चार दिवसांपासून भरती केले आहे. येथे डाॅक्टर, परिचारिका नियमित हजर असतात. बाळांची योग्य ती काळजी घेतली जाते. शिवाय आम्हीही येथेच असून, दूध पाजण्यापुरते बाळ मिळते.
- ताईबाई राठोड
दरेगाव
माझा मुलगा मागील १९ दिवसांपासून येथील बालकांच्या अतिदक्षता विभागात आहे. त्याची प्रकृती अतिशय नाजूक होती. मात्र, या रुग्णालयात त्याची योग्य ती काळजी घेतली गेली. येथे डाॅक्टर, परिचारिका येत असतात. मुलांची वारंवार तपासणी होती. आता मुलगा धोक्याबाहेर आहे. येथे सुरक्षितता वाटते तसेच सुविधाही चांगल्या आहेत.
- देवीदास राठोड,
- काजीदरा तांडा, औंढा